|Monday, February 24, 2020
You are here: Home » क्रिडा » केएल राहुलची तिसऱया स्थानी झेप

केएल राहुलची तिसऱया स्थानी झेप 

आयसीसी टी-20 क्रमवारी : कर्णधार विराट टॉप-10 मधून बाहेर,

वृत्तसंस्था/ दुबई

दमदार फॉर्ममध्ये असणाऱया केएल राहुलने आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सोमवारी जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत राहुलने तिसऱया स्थानावर उडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा ऍरॉन फिंच अग्रस्थानावर कायम असून पाकिस्तानचा फखार झमानने दुसरे स्थान कायम राखले आहे. झिम्बाब्वेत पार पडलेली तिरंगी टी-20 मालिका व भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेनंतर आयसीसीने नवी क्रमवारी जाहीर केली.

इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात राहुलने शानदार खेळी साकारताना शतकी साकारली होती. या चमकदार कामगिरीमुळेच राहुलने कारकिर्दीतील सर्वोच्च स्थान पटकावले आहे. राहुलच्या खात्यावर आता 812 गुण आहेत. अग्रस्थानावर असणाऱया फिंचचे 891 तर पाकच्या झमानचे 842 गुण आहेत. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची चार स्थानाने घसरण झाली असून तो आता 12 व्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 11 व्या स्थानावर आहे

गोलंदाजी क्रमवारीत अफगाणचा स्टार फिरकीपटू रशीद खानने अग्रस्थान कायम राखले आहे. पाकचा शादाब खान दुसऱया तर न्यूझीलंडचा ईश सोधी तिसऱया स्थानावर आहे. याशिवाय, भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने चौथे, विंडीजच्या सॅम्युअल बद्रीने पाचवे, न्यूझीलंडच्या सँटेनरने सहावे स्थान मिळवले आहे.

सांघिक क्रमवारीत टीम इंडिया दुसऱया स्थानी

झिम्बाब्वेत झालेल्या तिरंगी टी-20 मालिकेतील जेतेपदानंतर पाकने आपले अग्रस्थान आणखी मजबूत केले आहे. 132 गुणासह पाकिस्तान पहिल्या स्थानवर असून टीम इंडिया 124 गुणासह दुसऱया, ऑस्ट्रेलिया 122 गुणासह तिसऱया , इंग्लंड 117 गुणासह चौथ्या तर न्यूझीलंड 116 गुणासह पाचव्या, दक्षिण आफ्रिका सहाव्या, विंडीज सातव्या, अफगाणिस्तान आठव्या, श्रीलंका नवव्या तर बांगलादेश दहाव्या स्थानावर विराजमान आहे.

 

फलंदाजी क्रमवारी –

  1. ऍरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) – 891
  2. फखर झमान (पाकिस्तान) – 842
  3. लोकेश राहुल (भारत) – 812
  4. कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) – 801
  5. बाबर आझम (पाकिस्तान) – 765

 

गोलंदाजी क्रमवारी –

  1. रशीद खान (अफगाण) – 813
  2. शादाब खान (पाक) – 723
  3. ईश सोधी (न्यूझीलंड) – 700
  4. चहल (भारत) – 685
  5. सॅम्युअल बद्री (विंडीज) – 674.

 

Related posts: