|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पावसामुळे पुन्हा लेटमार्क; लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द

पावसामुळे पुन्हा लेटमार्क; लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द 

प्रतिनिधी मुंबई

गेल्या तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार कोसळणाऱया पावसाने मंगळवारी पुन्हा ओव्हरटाइम केला होता. काही भागात रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे मुंबईकरांची लाइफलाइन असणारी लोकल मंदावल्यामुळे सलग चौथ्या दिवशीही मुंबईकरांची दैना उडवून दिली होती. या पावसामुळे तिन्ही मार्गावरील वाहतूक सेवा उशिराने धावत होत्या. तर मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा लांबपल्ल्यांच्या गाडय़ांनाही फटका बसला. परिणामी मध्य रेल्वेच्या 172 फेऱया तर पश्चिम रेल्वेच्या 150 लोकल फेऱया आणि 50 फेऱयांना लेटमार्क लागला आहे.

मंगळवारी सकाळपासूनच पावसाने झोडपून काढल्यामुळे मुंबईतील रस्ते आणि रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने त्याचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला फटका बसला. मध्य रेल्वेवरील सँडहर्स्ट रोड जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अप-डाऊन मार्गावरील वाहतूक अर्धा तासापेक्षा उशीराने धावत होती. तर हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्यामुळे वाशी ते सीएसएमटी रेल्वे सेवा काही काळासाठी ठप्प करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही लोकल सेवा सुरू करण्यासाठी पंप लावून पाणी उपसण्यात आले. तसेच रिक्षा-टॅक्सी आणि बस सेवाही कोलमडल्याने प्रवाशांचे अतोनात झाले  असून मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा देखील बंद ठेवण्यात आली. तर पश्चिम रेल्वेवर वसई, नालासोपारा रेल्वे स्थानकात पाणी साचल्याने विरार ते बोरिवली रेल्वे वाहतूक सकाळच्या वेळेत ठप्प झाली होती. यामुळे बोरिवली ते चर्चगेट वाहतूक अर्धा तास उशिराने धावत होत्या. परिणामी सकाळी चर्चगेटच्या दिशेने निघालेल्या चाकरमान्यांचा खोळंबा झाला होता.

  लांब पल्ल्यांच्या गाडय़ा रद्द

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ा रद्द करण्यात  आल्या आहेत. तर काहीच्या मार्गात बदल केले आहे. पुणे-मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे-मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस, पुणे-कर्जत पॅसेंजर गाडय़ा रद्द केल्यामुळे मुंबईत कामासाठी आलेल्या पुणेकरांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, पुणे-भुसावळ-पुणे एक्सप्रेस ही दौंड-मनमाड-दौंड मार्गावरून वळविण्यात आली. तर वसईला पाणी भरल्याने पुणे-हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस ही दौंड-मनमाड-खांडवा-भोपाळ मार्गे, तुतिकोरीन-ओखाविवेक एक्सप्रेसला इगतपुरी-मनमाड-जळगाव मार्गे तर येसवंतपूर-बारमेर वातानुकूलित एक्सप्रेस इगतपुरी-भुसावळ-खांडवा-भोपाळ-रतलाम मार्गे वळविण्यात आली आहे.

Related posts: