|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » साबांखामंत्री सुदिन ढवळीकर आजारी

साबांखामंत्री सुदिन ढवळीकर आजारी 

मुंबईत ब्रिच कँडी इस्पितळात दाखल

प्रतिनिधी/ पणजी

राज्याचे साबांखामंत्री सुदिन ढवळीकर हे आजारी पडले असून मुंबईत एका नामांकित खाजगी इस्पितळात त्यांच्यावर प्रख्यात डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू आहेत. त्यांचे बंधू संदीप ढवळीकर हे स्वतः डॉक्टर असून सुदिन यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे व लवकरच ते गोव्यात परततील. जनतेने त्यांच्या आरोग्याची काळजी करू नये, असे आवाहन केले. मात्र ढवळीकर यांच्या प्रकृतीतील बिघाडामुळे संपूर्ण गोव्यात खळबळ माजली आहे. वर्षभरात आजारी पडणाऱया मंत्री-आमदारांमध्ये त्यांचा सहावा क्रमांक ठरला आहे.

 चार दिवसांपूर्वी हिराचंदानी इस्पितळात

 सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे अलिकडे किंचित आजारी पडले. मात्र दोन-तीन वेळा ते चेन्नई येथे जाऊन आले. यावेळी पुन्हा ते चेन्नईला तपासण्यासाठी गेले असता त्यांना मुंबईत जाऊन अगोदर तपासणी करून या, असे सांगताच 4 दिवसांपूर्वी मुंबईच्या हिरानंदानी इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या यकृताला किंचित सूज आल्याचे दिसून आले. त्यानंतर छोटय़ा स्वरुपात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातच बायोप्सी करून पुढील तपासणीसाठी तज्ञांकडे पाठविण्यात आले. मात्र अहवाल हाती आलेला नाही.

 सध्या ब्रिच कँडी इस्पितळात उपचार

मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या आरोग्याच्या बाबतीत त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी फार गुप्तता पाळली आहे. मात्र कधीही दीर्घ रजेवर न जाणारा हा मंत्री अलिकडे दोन-तीन वेळा रजेवर जात आहे, जनतेच्या भेटीस उपलब्ध असणार नाही असे वृत्त येताच त्याबाबत शोध घेता ढवळीकर हे देखील आजारी असून ते आता मुंबईच्या ब्रिच कँडी इस्पितळात उपचार घेत असल्याचे स्पष्ट झाले.

ढवळीकर यांची प्रकृती स्थिर : डॉ. संदीप

यासंदर्भात त्यांचे बंधू दीपक ढवळीकर यांच्याशी सोमवारी रात्री संपर्क साधला असता ते स्वतः नागपुरला गेल्याचे समजले, परंतु सुदिन ढवळीकर यांना केवळ तपासणीसाठी मुंबईत आणण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगळवारी सकाळी मात्र प्रसार माध्यमातून विविध बातम्या आणि त्यानंतर सोशल मिडियावरून अनेक अफवा आल्या. त्यानंतर दुपारी सुदिन ढवळीकर यांच्याबरोबर मुंबईत सातत्याने तज्ञ डॉक्टरांबरोबर उपस्थित असलेले त्यांचे बंधू डॉ. संदीप ढवळीकर यांनी ढवळीकरांच्या वतीने स्पष्टीकरण केले. मंत्री ढवळीकर यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून त्यांच्या आरोग्यात सुधारणा घडून येत आहे. जनतेचे आशीर्वाद व देवाचे आशीर्वाद पाठिशी आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ते अवघ्या काही दिवसांत गोव्यात परततील आणि आपल्या कामात रुजू होतील, असे त्यात नमूद केलेले आहे.

विधानसभेतील सहा आमदार आजारी

या वर्षभरात मुख्यमंत्र्यासह एकूण पाच आमदार आजारी पडले. आता ढवळीकर हेदेखील आजारी पडल्याने ही संख्या सहावर पोहोचली आहे. सत्ताधारी गटातील 5 आमदार आजारी पडले व विरोधी गटातील एक आमदार आजारी पडलेला आहे. गोवा विधानसभेतील आमदारांच्या आरोग्यालाच हे ग्रहण लागलेले आहे. यावरून आता गोवा विधानसभेच्या वास्तुमध्ये काही दोष आहे का? यावर सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.

 

काळजीचे कारण नाही : मुख्यमंत्री

ढवळीकर यांच्या गंभीर आजारपणामुळे मात्र एकच खळबळ माजली. ही गोष्ट खरी आहे का? असे प्रश्न एकमेकांना अनेकजण करू लागले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना अनेक मंत्री व आमदारांनी याबाबत प्रश्न केले असता मुख्यमंत्र्यांनी कोणतेही काळजीचे कारण नाही, असे सांगितले.

मंत्री ढवळीकर हे मुंबईत नेमके कोणत्या इस्पितळात दाखल झालेले आहेत, याबाबत अनेकांना कोणतीही कल्पना नाही. त्यामुळे आमदार वा मंत्री मुंबईला पोहोचू शकले नाहीत. आज काही नेते मुंबईत जाण्याची शक्यता आहे. सोशल मिडियावरून मंत्री ढवळीकरांच्या आजाराचे वृत्त मात्र संपूर्ण देशभर पोहोचले आहे.

ढवळीकर अधिवेशनाला पोहोचणार काय?

मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे, असे सांगितले असले तरी बायोप्सीचा अहवाल हाती आल्यानंतरच खऱया अर्थाने उपचार सुरू होतील. या दरम्यान ते विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहतील की नाही? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. विधानसभा अधिवेशनास अद्याप 8 दिवसांचा कालावधी असून या अधिवेशनात ढवळीकर यांना सहभागी होता आले तर ते आणखी एका आठवडय़ानंतर. तत्पूर्वी ते सहभागी होण्याची शक्यता कमीच आहे.