|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शाळाबाह्य मुलांना ‘अक्षरस्पर्श’

शाळाबाह्य मुलांना ‘अक्षरस्पर्श’ 

बांदा : संगणकाचे धडे घेतांना मुले.

 

मातृभाषेबरोबरच संगणकाचे धडेही : भंगाराच्या पिशवीऐवजी हाती आले दप्तर : बांदा जि.प.शाळेत 42 शाळाबाहय़ मुले

मयुर चराटकर / बांदा:

घरची बिकट परिस्थिती… अशात घरातील लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी… शिक्षणाबाबतची अनास्था.. मातृभाषेची अडचण… पालकांमधील वाद अन् पाठीवरचे बिऱहाड अशा विविध कारणांमुळे शैक्षणिक प्रवाहापासून दूर असलेल्या बांदा परिसरातील 42 मुलांना बांदा केंद्रशाळेने शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. भंगार गोळा करण्यासाठी हातात पिशवी आणि बांधकामासाठी हातात फावडे, कुदळ  घेत जिल्हाभर फिरणाऱया या मुलांच्या हातात आता दप्तर आले आहे. येथील शिक्षकांनी एवढय़ावरच थांबता या मुलांना संगणक साक्षर बनविले आहे. आता काही दात्यांच्या सहकार्यातून या मुलांना ‘टॅब’ देऊन हायटेक करण्याच्या प्रयत्नात येथील शिक्षक आहेत.

घरबांधणी, खोदाई, स्लॅब, चिरेखाणीत परराज्यातील म्हणजे कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, नेपाळ आणि राजस्थानचे कामगार काम करतात. असे अनेक राज्यातील कामगार जिह्यात विशेषतः बांद्यात ठाण मांडून आहेत. शेजारी गोवा राज्य आणि बांद्यात सहज उपलब्ध होणारा रोजगार या कारणामुळे येथे गेली अनेक वर्षे हा परप्रांतीय समाज झोपडय़ांतून वास्तव्याला आहे. त्यांची मुले नेहमीच शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. मुले सहा महिन्याची असतांनाही त्यांना सोबत घेऊन कामावर जाणारी ही माणसे आता आपल्या मुलांना शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी शाळेत पाठवित आहेत.

42 मुले घेताहेत धडे

 बांदा येथील प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये या ठिकाण वास्तव्य करणारी तब्बल 42 मुले शिक्षण घेत आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या दोन-तीन वर्षात येथील सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी त्यांनी दुसऱया शाळेतही प्रवेश केला आहे. येथील मुख्याध्यापक विजय देसाई व त्यांचे सहकारी शिक्षक या मुलांना शिक्षणाचे धडे देत आहेत.

 मुले परप्रांतीय असल्याने मातृभाषेची अडचण निर्माण होते. यात हिंदी, कन्नड, गुजराती, मारवाडी मातृभाषा असणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यात अभ्यासाची गोडी आणि मराठी रुजविण्यासाठी शिक्षकांना मोठी कसरत करावी लागते. हे शिक्षण देत असताना त्यांना अनेकदा जादा वेळ द्यावा लागतो. त्यातच त्यांचा जन्म दाखला मिळणे मोठे जिकिरीचे असते. बहुतांश मुलांचा परराज्यात जन्म असतो. तर काहींच्या जन्माची नोंद कुठेच नसते.

घरातील वातावरण प्रतिकूल

 परप्रांतीय कामगार अधिकतर मद्यपान करणारे असतात. तर काहीजण एवढे अवघड काम करतात की घरी आल्यावर त्या इवल्याशा झोपडीचा आधार घेत कधी एकदा आराम करतो, अशी परिस्थिती असते. तर काही घरात तंटे नेहमीचेच असतात. पाठीवरचे बिऱहाड असलेल्या झोपडीत वीज नसते. त्यामुळे केवळ दिव्याचाच आधार. मुलांची अभ्यास करण्याची इच्छा असूनही केवळ झोपडीला दिव्यापासून भीती असल्याने त्यांना अभ्यासालाही वेळ मिळत नाही. मात्र, आता त्यांच्यात थोडा बदल होत असल्याचे शिक्षक सांगतात. घरात लवकर अंधार होत असल्याने मुलांचा अभ्यास अर्धवट असतो. त्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी  शिक्षकांना ज्यादा अभ्यास घ्यावा लागतो. येथील शिक्षक ते काम अगदी आवडीने करतात.

अशी लावली अभ्यासाची गोडी

 येथे मुख्याध्यापकांसह नऊ शिक्षक कार्यरत आहेत. तर या शाळेत शहरी भाग असतांनाही एकूण 63 शाळाबाह्य मुले शिक्षण घेत आहेत. त्यात 42 मुले ही झोपडीत राहणारी आहेत. ही मुले शाळेत दोन दिवस न आल्यास येथील शिक्षक त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या झोपडीत जातात. त्यांच्या घरातील मंडळींशी बोलत शाळेत पाठविण्याची विनंती करतात. शाळेत आल्यावर इतर मुलांसारखीच वागणूक त्यांना दिली जाते. शाळेतील सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातही त्यांचा सहभाग घेतला जातो. गेल्यावर्षी तर एका मुलाने क्रीडा क्षेत्रात जिह्यात प्रथम येण्याचा मान मिळविला होता. संगणकीय शिक्षणही त्यांना दिले जाते. त्यातही त्यांना नवीन काय शिकायला मिळते म्हणून ही मुले न चुकता शाळेत येतात. त्यांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी शिक्षकांची मोठी धडपड असते. बांदा शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि दाते यांच्या माध्यमातून त्यांना काही प्रमाणात शैक्षणिक साहित्य देण्यात येते. तर काही मुलांचा गतवर्षीचा गणवेश या मुलांना देण्यात येतो. आंघोळ न करता आलेल्या मुलांना येथील शिक्षक स्वतः आंघोळ घालतात. यंदा तर या शाळेत मुले वाढली आहेत.

बांदा : येथील शिक्षक झोपडय़ांमधून शाळाबाहय़ मुलांचा शोध घेतात.

इतर शाळांनी आदर्श घेणे गरजेचे!

 जिह्यातील अनेक भागात शाळाबाह्य मुले राहतात. अनेक ठिकाणी लमाणी वस्तीतून मुले शाळाबाहय़ आहेत. अशा झोपडीत राहणाऱया मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यातून आपल्या शाळेची पटसंख्याही वाढणार आहे. त्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी अशा मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे गरजचे आहे.

शिक्षक वर्गाचे काम आदर्शवत…

 येथील केंद्रशाळेत मुख्याध्यापक म्हणून विजय देसाई, अनुराधा धामापूरकर, नंदकिशोर कवठणकर, वंदना शितोळे, शुभेच्छा सावंत, शिल्पा ठाकर, रसिका मालवणकर, विशुदा आजगावकर आणि जागृती धुरी असे नऊ शिक्षक कार्यरत आहेत. बाजारपेठेत असलेल्या या शाळेत शाळाबाह्य मुलांमुळेच पटसंख्या 260 वर पोहोचली आहे. येथील शिक्षक वर्गामुळेच हे शक्य झाले आहे.

Related posts: