|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » शेतकऱयांना न्याय देण्याची क्षमता भाजपमध्येच

शेतकऱयांना न्याय देण्याची क्षमता भाजपमध्येच 

पंजाबमधील किसान कल्याण सभेत मोदींची ग्वाही

मालौत (पंजाब) / वृत्तसंस्था

काँगेसने आजपर्यंत शेतकऱयांचा उपयोग केवळ मतपेढी म्हणून केला आहे. केवळ एका कुटुंबाचे हित जोपासण्यासाठी या पक्षाने शेतकऱयांना वेठीस धरले. तथापि, शेतकऱयांच्या जीवनमानात अमूलाग्र बदल घडवून आणणे हे भाजप सरकारने ध्येय आहे. कृषी उत्पादनांच्या किमान आधारभूत मूल्यांमध्ये मोठी वाढ करून भाजपने आपले निवडणूक आश्वासन पूर्ण केले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी येथील शेतकरी जाहीर सभेत केले. अकाली दलाचे नेतेही या सभेला उपस्थित होते.

गेली अनेक दशके शेतकऱयाच्या पदरी केवळ निराशा पडत आहे. या कालावधीत त्यांना त्यांच्या भांडवली गुंतवणुकीवर केवळ 10 टक्के प्रमाणात लाभ होत होता. शेतकरी या देशाचा आत्मा असून त्याचे जीवनमान सुधारणे हे आमचे ध्येय आहे. त्यामुळे किमान आधारभूत दरात लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी मांडणी त्यांनी केली.

नैसर्गिक परिस्थिती अशीही असो, शेतकऱयाचे कष्ट चुकत नसतात. पण कष्टांच्या तुलनेत त्यांच्या पदरात काहीच पडत नाही. ही स्थिती बदलण्याचा कसून प्रयत्न सरकारने केला असून त्याची फळे लवकरच शेतकऱयांना मिळणार आहेत, असा आशावादही त्यांनी प्रकट केला.

तीन्ही राज्यांमधील शेतकरी

या सभेला पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमधील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. मालौत हे क्षेत्र या तिन्ही राज्यांच्या तिठ्ठय़ावर असल्याने तेथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणात मोदींनी व्यवसाय सुलभता, औद्योगिक विकास आणि पाणीपुरवठा, जलसिंचन सुविधा आदी महत्वाच्या मुद्दय़ांवरही भाष्य केले.