|Sunday, June 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘अंबाबाई तीर्थक्षेत्रा’च्या कामांचे अंदाजपत्रक सादर करा

‘अंबाबाई तीर्थक्षेत्रा’च्या कामांचे अंदाजपत्रक सादर करा 

प्रतिनिधी/कोल्हापूर :

 अंबाबाई मंदीर तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ातील पहिल्या टप्प्यातील 80 कोटींच्या कामांचे अंदाजपत्रक सार्वजनिक विभागाकडून तपासणी करून 20 जुलैपर्यंत सादर करा, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापालिकेला दिले. प्राधान्यक्रमाने करण्यात येणाऱया कामांचे सविस्तर इस्टीमेट देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

राज्य शासनाने अंबाबाई मंदीर परिसराच्या विकासासाठी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा केला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील कामासाठी 80 कोटींचा निधी मंजूर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतेखालील शिखर समितीने या निधीला अंतिम मंजूरी दिली आहे. लवकरच महापालिकेच्या तिजोरीत हा निधी जमा होणार असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

श्रीक्षेत्र जोतिबा विकास आराखडा तसेच अंबाबाई मंदिर परीसर विकास आराखडय़ाची बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली,

यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दुसऱया टप्प्यातील कमांची सविस्तरपणे माहिती दिली. यानंतर डॉ. म्हैसेकर म्हणाले, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास विकास आराखडय़ांतर्गत सविस्तर अंदाजपत्रके मुख्यमंत्र्यांच्या तांत्रिक मान्यतेसह नगर विकास विभागाला तत्काळ सादर करा. अंबाबाई तीर्थक्षेत्र व श्रीक्षेत्र जोतिबा विकास आराखडय़ाबाबत आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने केल्या जातील. या कामी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून या दोन्ही तीर्थ क्षेत्रांच्या विकासाच्या कामास सक्रीय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.