|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कुपवाडामध्ये दहशतवाद्याचा खात्मा

कुपवाडामध्ये दहशतवाद्याचा खात्मा 

श्रीनगर / वृत्तसंस्था :

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये गुरुवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला यमसदनी पाठविले आहे. तेथील दहशतवाद्यांसोबतची चकमक गुरुवारी उशिरापर्यंत सुरूच होती.

कुपवाडा जिल्हय़ाच्या जंगली भागात सुरू असलेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेल्याचे सैन्याच्या एका अधिकाऱयाने सांगितले. सैनिकांच्या एका गस्त पथकावर गोळीबार झाल्यानंतर कुपवाडाच्या कांदी वनक्षेत्रात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात मोहिमेस प्रारंभ केला होता.

बुधवारी कुपवाडा जिल्हय़ात निदर्शक आणि सैन्याच्या एका गस्तपथकादरम्यान झालेल्या संघर्षात एक फुटिरवादी मारला गेला होता. मृत फुटिरवाद्याचे नाव खालिद गफ्फार असून तो कुपवाडा येथील त्रेहगाममध्ये  मारला गेला.

इंटरनेट सेवा बंद

खालिदच्या मृत्यूनंतर भागात तणावाचे वातावरण आहे. प्रशासनाने गुरुवारी त्रेहगाम भागात संचारबंदी लागू केली. रस्त्यांवर हिंसक निदर्शने होण्याच्या शक्यतेमुळे हा निर्णय घेण्यात आला. कुपवाडा येथील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रशासनाने बारामूल्ला आणि कुपवाडामध्ये खबरदारीच्या स्वरुपात मोबाईल इंटरनेट सेवांवर बंदी घालण्यात आली आहे.

बचावासाठी गोळीबार

बुधवारी रात्री 8 वाजता 30 ते 40 जणांच्या समुहाने सैन्याच्या गस्तपथकावर दगडफेक केली. दगडफेक करणाऱयांना तोंडी इशारा देण्यात आला. तरीही दगडफेक सुरूच राहिल्याने हिंसक जमावाला पांगविण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला. पण जमावाने हिंसाचार सुरूच ठेवल्याने 5 सैनिक जखमी झाले. बचावासाठी हिंसक जमावावर गोळीबार करावा लागल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.

Related posts: