|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार

वादळी वाऱयांसह ‘तरणा’ धुवाँधार 

जिल्हय़ात अनेक ठिकाणी घरांची पडझड

जी. जी. पी. एस. चे पत्रे उडाले

लांजात धाब्यात घुसले पुराचे पाणी

प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन

प्रतिनिधी /रत्नागिरी

‘पुर्नवसू’ (तरणा) नक्षत्रामध्ये जिल्हावासीयांना चांगलाच दणका दिला असून गुरूवारी सोसाटय़ाच्या वादळी वाऱयांसह झालेल्या धुवाँधार पावसाने विविध ठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या. रत्नागिरीतील जीजीपीएस शाळेच्या छपराचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळेला सुटी जाहीर करण्यात आली. लांजातील बेनी नदीला पूर आला असून त्याचे पाणी हॅप्पी पंजाबी धाब्यात घुसले. ठिकाणी घर व गोठय़ांचे नुकसान होऊन त्यात लाखोंची हानी झाली. पावसाचा जोर 15 जुलैपर्यंत कायम राहील असा अंदाज हवमान खात्याने व्यक्त केला आहे.

नक्षत्रावरून पावसाच्या अंदाजाला विज्ञानाचा आधार नाही आणि विज्ञानाच्या आधारे सांगितलेले पावसाचे अंदाजही किती चुकीचे ठरतात, याचाही दरवर्षी प्रत्यय येत असतो. जुनी माणसं नक्षत्रावरून पावसाचे ठोकताळे बांधायचे. आर्द्रा, पुर्नवसू, पुष्य, हस्त ही नक्षत्रे धुवाँधार बरसतात, असे सांगितले जाते. पण अलिकडे पावसाचा लहरीपणा नक्षत्राप्रमाणे दिसून येत नाही.

सध्या पुर्नवसू (तरणा) चा चांगलाच जोर सर्वत्र जाणवत आहे. रत्नागिरीत या नक्षत्राने झोडपून काढले आहे. जिल्हय़ात खेड, संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, राजापूर या तालुक्यात अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटना घडत आहेत. जिल्हय़ात गुरूवारी 12 जुलै रोजी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात सरासरी 57.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे हनुमाननगर येथे यादिवशी सकाळी सोसाटय़ाच्या वाऱयाने एका घराचे पत्र्याचे छप्पर उडून मोठे नुकसान झाले.

जी.जी.पी.एस.चे पत्रे उडाले

जी.जी.पी.एस. प्रशालेल्या इमारतीच्या छपरावरील पत्रे वादळी वाऱयामुळे उडून मोठे नुकसान झाले. गुरूवारी सकाळच्या सत्रात सोसाटय़ाच्या वाऱयांमुळे ही घटना घडली. यावेळी फॅनही तुटून वर्गात पडल्याचे समजते. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झालेली नाही. मुख्याध्यापकांच्या केबीनवरील पत्रेही उडून गेले. या घटनेनंतर दुपारच्या सत्रातील शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान शुक्रवारीही अशीच परिस्थिती असल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये अशा सूचना शाळा प्रशासनाने केल्या आहेत.

जिल्हय़ात पडलेल्या पर्जन्यमानाची आकडेवारी पुढीलप्रमाणे (मिमी मध्ये)ः

मंडणगड – 52, दापोली -20, खेड 52, गुहागर-6.00, चिपळूण -80, संगमेश्वर-75, रत्नागिरी-52, लांजा -98, राजापूर-84

बेनी नदीचे पाणी घुसले हॅपी ढाब्यात

मुसळधार पावसामुळे लांजातील बेनी नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरानजीकच्या जुन्या हॅपी ढाब्यात घुसले असून कुवेतील सखल भागात पाणी साचले होते.

गुरूवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने दुपारच्या काही काळाचा अपवाद सोडता सायंकाळपर्यंत सातत्य राखले. तालुक्यातील बहुतेक सर्वच नद्यांना पूर आला होता. बेनी नदीला आलेल्या पुराचे पाणी जुना हॅपी ढाब्यामध्ये घुसले. मात्र वेळीच दक्षता घेतली गेल्याने नुकसान टळले. कुवेतील काही सखल भागात पाणी साचले होते.

Related posts: