|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘त्या’ त्रिकुटाला 25 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

‘त्या’ त्रिकुटाला 25 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी 

प्रतिनिधी /बेळगाव :

कडोलकर गल्ली येथील कालिका दैवज्ञ सहकारी नियमीतमध्ये ग्राहकांनी तारण ठेवलेले साडेचार किलो सोन्याचे दागिने फायनान्स कंपन्यांकडून ठेवून 83 लाख रुपये उचलण्यात आले होते. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना न्यायालयाने 27 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान 1 कोटी 10 लाख रुपये किमंतीचे साडेचार किलो सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहे. 

सरव्यवस्थापक मंगेश शशिकांत शिरोडकर (वय 45 रा. शास्त्रीनगर), श्रीशैल यमनाप्पा तारिहाळ (वय 35 रा. मारिहाळ), मारुती महाबळेश्वर रायकर (वय 45 रा. नार्वेकर गल्ली शहापूर) अशी त्यांची नावे आहेत. या त्रिकुटाला चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत घेण्यात आले होते. कोठडीची मुदत संपल्यामुळे गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

न्यायालयाने सर्व तिघा जणांना 25 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी, व्ही. एस. कुंगारे, शंकर शिंदे, भारती कोळ्ळी, वाय. बी. हत्तरवाट, आदींनी 6 जुलै रोजी या त्रिकुटाला अटक केली होती.

खडेबाजार येथील मुथुट्ट फायनान्स, गोवावेस जवळील मनपुरम फायनान्स लि., शहापूर येथील एन. एन. वेर्णेकर मनिलेंडर व समादेवी गल्ली येथील बेळगाव अर्बन सौहार्द सहकारी लि. मध्ये या त्रिकुटाने साडेचार किलो सोन्याचे दागिने तारण ठेवून कर्जाची उचल केली होती. हे दागिने पोलिसांनी जप्त केले असून त्याची किंमत 1 कोटी 10 लाख रुपये इतकी होते.