|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » गाळे लिलावाला अखेर मुख्यमंत्र्यांची स्थगिती

गाळे लिलावाला अखेर मुख्यमंत्र्यांची स्थगिती 

प्रतिनिधी /सोलापूर :

महापालिकेच्या मालकीच्या गाळे लिलाव पद्धतीने देण्याच्या शासन निर्देशानंतर पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रक्रियेवर गेल्या पंधरा दिवसांपासून गाळेधारक, व्यापारी आणि पालिका प्रशासन व सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी सुरू होती. गाळ्यांच्या ई-लिलाव पद्धतीला घेऊन पेटलेल्या विषयाला अखेर मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावला आहे. पालिका प्रशासनाच्या लिलाव प्रक्रियेला तूर्त स्थगिती देत यावर वेगळे धोरण केले जाणार आहे. यानुसार तसे आदेश पालिकेच्या प्रशासनाला देण्यात आले आहे.

  पालिकेच्या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शवून गाळेधारक व्यापारी संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा, आंदोलन, धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात व्यापाऱयांनी आपल्या कुटुंबियांसह सहभाग नोंदविला होता. आंदोलन तीव्र करत असताना संघर्ष समितीच्यावतीने भाजपा वगळता सर्व विरोधी पक्षांच्या माध्यमातून 12 जुलै रोजी सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या प्रकाराला गांभीर्याने घेऊन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गाळेधारकांची समजूत काढली. यामुळे सोलापूर बंदची हाक तूर्त मागे घेण्यात आली होती. आज गुरुवारी महापौरांसह शिष्टमंडळाद्वारे सहकारमंत्री देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक नागपूर  घेतली. चिघळलेल्या या गाळे लिलावाच्या मुद्याला तूर्त स्थगिती देऊन पुढील निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. यामुळे गाळेधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

  महापालिकेच्या मालकीच्या 514 मेजर गाळ्यांसह एकूण 1386 गाळे विविध भागात आहेत. या गाळ्यांची मुदत संपल्याने व मध्यंतरीच्या काळात हा प्रश्न शासन स्तरावर निर्णयासाठी प्रलंबित होता. मात्र गत महिन्यात पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी महापालिकेचे आर्थिक हितास बाधा येणार नाही, अशा पद्धतीने गाळ्यांची भाडेवाढ करण्यात यावी असे निर्देश शासनाच्या नगरविकास विभागाने दिले होते. यावरुनच महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी पारदर्शक प्रक्रियेसाठी ई लिलाव पद्धत सुरू केली होती. मात्र याला जोरदार विरोध झाला होता.

Related posts: