|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » छाननीत भाजपा, राष्ट्रवादीला दणका

छाननीत भाजपा, राष्ट्रवादीला दणका 

प्रतिनिधी /सांगली :

महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जावर गुरुवारी छाननी झाली. यामध्ये प्रभाग अठरामधून भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अपात्र ठरले. तर मिरजेतील चार भाजपा उमेदवारांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने याचा शुक्रवारी निकाल दिला जाणार आहे. छाननीमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीला दणका बसलेला असताना काँग्रेसचे महापौर मात्र बचावले आहेत. दरम्यान, छाननी वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महापालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु असून 1 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मुदतीमध्ये 869 उमेदवारांचे 1128 अर्ज दाखल झाले होते. या अर्जावर तीनही शहरातील सहा निवडणूक कार्यालयामध्ये स्वतंत्रपणे छाननी झाली. यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीला दणका बसला. तर विरोधकांनी आक्षेप घेतल्याने अडचणीत आलेली काँगेस बचावली. सांगलीतील प्रभाग अठरामधून  राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती आदाटे यांचा पक्षांमार्फत भरलेल्या अर्जावर आक्षेप घेतल्याने तो बाद करण्यात आला. आदाटे यांच्या दोन्ही अर्जावर सूचक आणि अनुमोदक एकच असल्याने आणि पहिल्यांदा अपक्ष अर्ज छाननीत पात्र ठरल्याने दुसरा अर्ज बाद ठरविण्यात आला.

याच प्रभागातील भाजपाचे उमेदवार सूरज चोपडे यांचा अर्ज प्रवर्ग बदलल्याने अपात्र ठरविण्यात आला. त्यांना पक्षाने ड प्रवर्गामधून एबी फॉर्म दिला होता. मात्र क मधून भरला होता. त्यामुळे या प्रभागात भाजपा व राष्ट्रवादीला धक्का बसला असून दोन्ही ठिकाणी पुरस्कृत उमेदवार करावे लागणार आहेत. प्रभाग सोळामधून काँग्रेसचे महापौर हारुण शिकलगार यांच्या अर्जावर तिसऱया अपत्याबाबत सामाजिक कार्यकर्ते आसिफ बावा, उमेदवार उमर गवंडी यांनी आक्षेप घेतला होता. यावरुन दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केला. निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी आक्षेप फेटाळत महापौरांचा अर्ज पात्र ठरवल्याने काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला.

Related posts: