|Tuesday, March 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आता घरपट्टी भरा एका क्लिकवर !

आता घरपट्टी भरा एका क्लिकवर ! 

प्रतिनिधी /बेळगाव :

घरपट्टी भरण्यासाठी चलन घ्या, भरण्यासाठी बँकेत रांगेत थांबा अशा विविध  कटकटींपासून बेळगावकरांची सुटका झाली आहे. अखेर ऑनलाईन घरपट्टी भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी महापौर बसप्पा चिकलदिन्नी यांच्या हस्ते करण्यात आला. ऑनलाईन घरपट्टी भरण्यासंदर्भात यावेळी माहिती देण्यात आली.

आता घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी कसरत थांबणार असून यापुढे घरबसल्या घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. घरपट्टी भरण्यासाठी मालमत्तांची नोंद संगणकावर करण्यात आली असून प्रत्येक मालमत्तेला आयडी क्रमांक देण्यात आला आहे. क्रमांकाच्या आधारे ऑनलाईनद्वारे मालमत्तेचा तपशील तसेच घरपट्टीची माहिती उपलब्ध होणार आहे. शहरात 1 लाख 20 हजार मालमत्ता असून सर्व मालमत्तांना आयडी क्रमांक देण्यात आला आहे. यापुढे नागरिकांना डेबिट व पेडिट कार्डच्या साहाय्याने घरपट्टी भरता येणार आहे. महापालिकेच्या http:// belgavicitycorp.org/ या संकेतस्थळावर लॉगऑन केल्यानंतर मालमत्तांची माहिती आणि घरपट्टी भरण्याबाबतची माहिती उपलब्ध होईल. त्यावर मालमत्ता आयडी क्रमांक, वॉर्ड क्रमांक, मालमत्ता कर आकारणी जुना व नवीन क्रमांक, मालमत्ताधारकाचे नाव किंवा मोबाईल क्रमांकद्वारा मालमत्तेचा तपशील पाहता येणार आहे. घरपट्टी भरून त्याची पावती प्रिंट करून घेता येऊ शकते. अशा प्रकारे घरपट्टी ऑनलाईन सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. या प्रक्रियेमुळे मालमत्ताधारकांची सोय झाली आहे. यापूर्वी मालमत्ताधारकांची संपूर्ण माहिती संगणकावर नोंद करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिली. या सुविधेचा शुभारंभ महापौर बसाप्पा चिकलदिन्नी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रभारी महसूल उपायुक्त ए. एस. कांबळे, प्रभारी सामान्य प्रशासन उपायुक्त डॉ. शशीधर नाडगौडा तसेच संगणक विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

Related posts: