|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मासळी व्यवसायात गैरकृत्य खपवून घेणार नाही

मासळी व्यवसायात गैरकृत्य खपवून घेणार नाही 

प्रतिनिधी/ पणजी

मासळी व्यावसायिकांनी गोव्यातील जनतेच्या जीवाशी खेळू नये. असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत आणि अशा प्रकारच्या कृत्यांत गुंतलेल्यांची गय केली जाणार नाही, असे स्पष्ट इशारा मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी दिला आहे.

हे सरकार गोंयकारांचे आहे आणि गोंयकारांचे हीत जपण्याची जबाबदारी सरकारवर आहे. फॉर्मेलीनसारखे घातक रसायन वापरून पैसे कमावण्यासाठी भयानक गैरकृत्य करणाऱयांची गय केली जाणार नाही. गैरकृत्य करणाऱयांचे गॉडफादर कुणीही असले तरी पर्वा केली जाणार नाही, असेही पालयेकर यांनी सांगितले. मासे ताजे ठेवण्यासाठी फॉर्मेलीनसारखा घातक रसायनाचा वापर केला जातो हेच मुळात धक्कादायक आहे. राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनालयाने कारवाई करून हा प्रकार उघडकीस आणला. न पेक्षा राजरोसपणे चाललेला हा प्रकार उघड  झालाच नसता. एफडीएने केलेली कारवाई हा त्याच्या जबाबदारीचा एक भाग आहे. त्यामुळे कारवाई केली म्हणून एफडीएला दोष देता येणार नाही.

लाखो रुपयांचा व्यवसाय करणारे मोजके लोक गोव्यातील लाखो लोकांच्या जीवाशी खेळत आहे. चांगल्या पद्धतीने आणि जबाबदारीने व्यवसाय करणारे अनेक मच्छीमार बांधव आहेत. त्यांच्यावर कुणी ठपका ठेवणार नाही. पण गैरकृत्य करणाऱया व्यावसायिकाना मात्र खुले सोडता येणार नाही. मच्छीमार खाते यानंतर आपल्या पद्धतीने काम करणार आहे. गोमंतकीय जनतेच्या जीवाशी खेळणाऱयांची गय केली जाणार नाही.

आपण मच्छीमार खात्याचा मंत्री असल्याने मच्छीमार व्यावसायिक क्षेत्रात घडणारे हे गैरप्रकार अत्यंत क्लेशदायक ठरत आहे. कुणाच्या तरी गैरकृत्याचा जाब आज सरकारला द्यावा लागत आहे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे पालयेकर यांनी सांगितले. गोंयकारपण व गोंय जपायचे असल्यास अशा गैरकृत्याना आळा घालावाच लागेल. नपेक्षा सरकार जनतेचे आरोग्य पणाला लावते असा त्याचा अर्थ होईल, असेही पालयेकर यांनी सांगितले. मच्छीमार व्यवसाय क्षेत्रात असा प्रकार घडावा याचे आपल्याला प्रचंड दु:ख आहे, असेही ते म्हणाले.

रसायनयुक्त मासे जप्त करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

फॉर्मेलीन वापरून ताजे ठेवलेले मासे जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अन्न आणि औषध प्रशासनाला दिले आहेत. आपण स्वत: या विषयावर लक्ष ठेऊनही आहे. मासे हे गोमंतकीयांचे आवडीचे खाद्य आहे. त्यामुळे फॉर्मेलीनचा वापर केलेले मासळीचे ट्रक जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर अशाप्रकारे रसायनचा वापर करून गोव्यात आणली जाणारी भाजी आणि फळेही जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. अशा गैरकृत्यात गुंतलेल्या विरोधात कठोर कारवाई करून त्यांना कायद्याच्या कचाटय़ात आणण्याचीही सूचना केली आहे.