|Saturday, February 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » मनाला भिडणाऱया कवितेतून होम स्वीट होमच्या पहिल्या लूकची झलक

मनाला भिडणाऱया कवितेतून होम स्वीट होमच्या पहिल्या लूकची झलक 

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोएक्टीव्ह आणि स्वरूप रिक्रीएशन्स अँड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर नुकताच लाँच करण्यात आला. चित्रपटातील नायक किंवा नायिकेचा चेहरा, गाणे या माध्यमातून चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर येतो. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच घराचे रेखाचित्र आणि घरावरची एक सुंदर कविता असा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे.

 होम स्वीट होमच्या फर्स्ट लूकमध्ये शहरातील प्रशस्त इमारतीमधील आणि गावातील एका जुन्या धाटणीचे घर दिसत आहे. त्याच्या सोबतीला सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांची घराचे वर्णन करणारी सुंदर कविता आहे ती सुद्धा त्यांच्याच आवाजात कवितेत घर, आसपासचे दरी डोंगर, घराचा उंबरठा, अंगण, सभोवतालची हिरवळ, त्रिकोणी छप्पर, काटेरी कुंपण असे सहज सुचणारे साधे- सोपे शब्द मनाला अलगद भिडणारे आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे ‘होम स्वीट होम’ या चित्रपटाचे निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर, विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध लेखक, अभिनेते हृषीकेश जोशी यांनी केले असून दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात कोणते कलाकार आहेत? आणि या चित्रपटामध्ये नक्की काय आहे? हे जाणून घेण्याविषयी उत्कंठा निर्माण झाली आहे. घर आणि त्याचे घरपण हे आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहेत. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातील एका घराची प्रतिमा दडलेली असते. कुणाला घर म्हणून प्रशस्त इमारतीमध्ये फ्लॅट हवा असतो, तर कुणाला घरासमोर अंगण हवं असतं. घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे होम स्वीट होम असतं. होम स्वीट होम हा चित्रपट 28 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Related posts: