|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » धोनीच्या क्षमतेवर शंका घेणे दुर्देवी: कोहली

धोनीच्या क्षमतेवर शंका घेणे दुर्देवी: कोहली 

धोनीच्या संथ खेळामुळे मैदानात पेक्षकांकडून नाराजी व्यक्त

वृत्तसंस्था/ लंडन

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱया लॉर्ड्सच्या मैदानावर शनिवारी इंग्लंडविरुद्ध दुसऱया वनडे सामन्यात महेंद्रसिंग धोनीने वनडे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. मात्र धोनीच्या या विक्रमाला भारताच्या पराभवामुळे वादाची किनार लाभली आहे. मोक्याच्या क्षणी केलेल्या संथ फलंदाजीमुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांनी मैदानात धोनीची हुर्यो उडवली. दरम्यान, कर्णधार कोहलीने मात्र चाहत्यांच्या या वागणुकीला चांगलाच समाचार घेताना धोनीच्या बचावासाठी धाव घेतली. प्रेक्षकांची ही वागणुक दुर्देवी असल्याचे मत विराटने व्यक्त केले आहे.

लॉर्ड्सवरील दुसऱया सामन्यात भारताला 86 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर भारताची संपूर्ण मदार धोनीवर होती. मात्र, धोनीला सामना खेचून आणता आला नाही. त्याने 59 चेंडूत अवघ्या 37 धावा केल्या. धोनीच्या संथ फलंदाजीमुळेच भारताला अपेक्षित धावगती राखता आली नाही. सामना हातातून जाणार हे दिसताच भारतीय चाहते निराश झाले व मैदानावरच त्यांनी धोनीची हुर्यो उडवली.

सामना संपल्यानंतर मात्र पत्रकार परिषदेत धोनीच्या खेळाबद्दल प्रश्न विचारला असता कर्णधार कोहलीने मात्र धोनीचे समर्थन केले. ‘ज्यावेळी धोनी चांगली फलंदाजी करत नाही तेव्हा त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निमार्ण केले जाते. एका खेळीवरुन लोक लगेच निष्कर्षापर्यंत जाऊन पोहचतात हे योग्य नाही. ज्यावेळी धोनी मैदानात आक्रमक खेळतो त्याला सर्वोत्तम फिनिशर म्हणतात. क्रिकेटमध्ये सगळेच दिवस सारखेच नसतात. शनिवारचा दिवसही त्याच्यासाठी नव्हे तर संपूर्ण संघासाठी वाईट होता, अशा शब्दांत कोहलीने धोनीचा बचाव केला आहे.