|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विचित्र माणसे

विचित्र माणसे 

त्या देशातली किंबहुना बाहेरच्या जगातली-माणसे विचित्रच आहेत.

 गेल्या महिन्यात तिथे एक विचित्र अपघात घडला. बारा अल्पवयीन फूटबॉल खेळाडूंचा संघ खेळाचा सराव केल्यानंतर आपल्या प्रशिक्षकासह एक गुहा पहायला गेला. गुहेत ते थोडे खोलवर गेले आणि अचानक तिथली भूगर्भातून येणाऱया पाण्याची पातळी वाढल्यामुळे तिथे अडकून पडले. स्वतःच्या ताकदीने त्यांना तिथून बाहेर येता येणे शक्मय नव्हते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू झाले. तब्बल अठरा दिवस हे तेरा जण त्या भुयारवजा जागेत अडकले होते. अमेरिकी नौदलाचे एक पथक आणि ब्रिटीश जलतरणपटू त्यांच्या मदतीला धावले. त्यांच्या बाहेर येण्याच्या मार्गावर प्रचंड पाणी जमा होत होते. ते पाणी आधी मोठे पंप लावून काढण्यात आले. अठरा दिवसांनी त्यांना बाहेर सुखरूप काढण्यात यश आले. आता सर्वांना रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. 

आता यात विचित्र काय आहे, ते सांगतो.

अठरा दिवसांच्या कालखंडात या सनसनाटी घटनेची फार मोठी बातमी कुठे आली नाही. आपल्याकडे बोअरवेलमध्ये एखादे मूल पडल्यावर जशी अहोरात्र ब्रेकिंग न्यूज दाखवली जाते आणि टीव्हीवाले, बघे यांच्या गर्दीमुळे मदतकार्यात अडथळा येतो तसे त्या देशात झाले नाही. त्यामुळे मदतकार्य सुरळीतपणे पार पडले.

  या घटनेनंतर टीव्हीवर चर्चासत्रे झडली नाहीत. विरोधक आणि सरकार यांनी एकमेकांना धारेवर धरले नाही किंवा राजीनामे मागितले नाहीत. परिसंवाद आयोजित करून त्यात विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवणे आणि सरकारने विरोधकांना “तुम्ही साठ वर्षात काय केले?’’ असे उर्मट प्रश्न विचारणे… अशातली एकही गोष्ट घडली नाही. 

मदतकार्य चालू असताना मुलांच्या नातेवाईकांना गाठून पत्रकारांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या नाहीत. अर्धवट ज्ञानानिशी कव्हर स्टोरीज केल्या नाहीत.

तिथल्या जनतेने व्हॉट्सऍपवर या बातमीच्या संदर्भात बोगस बातम्या किंवा अफवा पसरवल्या नाहीत. एकमेकांना फॉरवर्ड केल्या नाहीत.

ती मुले कोणत्या जातीची किंवा धर्माची होती, त्यांचे प्रशिक्षक कोणत्या जातीचे किंवा धर्माचे होते, मदतकार्यात भाग घेणाऱया पथकातील सभासद कोणत्या जातीचे किंवा धर्माचे होते याची उठाठेव तिथल्या मीडियाने किंवा सरकारने अजिबात केली नाही.

हे सगळे किती विचित्र वाटते, नाही?

Related posts: