भडगाव पूलावर पाणी आल्याने चंदगड मार्गावरची वाहतूक ठप्प

प्रतिनिधी/ गडहिंग्लज
गडहिंग्लज शहरासह परिसरात दुपारनंतर पावसाची उघडीप असली तरी आजरा परिसरात सुरू असणाऱया जोराच्या पावसामुळे हिरण्यकेशी नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. हिरण्यकेशीवरील भडगाव पूलावर पाणी आल्याने नेसरी, महागाव, चंदगड भागातील संपूर्ण वाहतूक सायंकाळी 7 नंतर बंद करण्यात आली. भडगावसह ऐनापूर, जरळी, निलजी आणि नांगनूर हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
आजरा परिसरात असणाऱया जोराच्या पावसाचा परिणाम हिरण्यकेशी नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. दुपारनंतर हिरण्यकेशीचे पाणी भडगाव पूलावर आल्याने या मार्गावरची वाहतूक संथ झाली होती. या पूलावरूनच संपूर्ण चंदगड तालुक्यासह महागाव, नेसरी भागातील वाहतूक होत असते. 5 नंतर पुन्हा पाण्याची पातळी वाढल्याने दुचाकी, लहान चारचाकी वाहने रोखून धरण्यात आली. याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पूर पहाण्यासाठी गडहिंग्लजकरांनी भडगाव पूलावर गर्दी केली होती. खबरदारीचे उपाय म्हणून रात्री 7 नंतर एस. टी. वाहतूकही बंद करण्यात आली. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात गडहिंग्लज (39), कडगाव (38), दुंडगे (22), हलकर्णी (20), नूल (15), महागाव (41) आणि नेसरी (54 मिमी) पाऊस झाला आहे. नदीकाठच्या गावांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.