|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला

केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव ; शुक्रवारी फैसला 

ऑनलाईन टीम / मुंबई :

देशातील समस्या सोडविण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा म्हणून तेलुगू देसम पार्टीने केंद्र सरकारविरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी चर्चेसाठी स्वीकारला आहे. त्यामुळे काठावर बहुमत असलेल्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची गोची होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यास एनडीएतील मित्र पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असून पहिल्यांदाच अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागणार असल्याने भाजपला आता मित्र पक्षांची मनधरणी करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

टीडीपीच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली होती. टीडीपीचे खासदार के. श्रीनिवास यांनी ही नोटीस दिली होती. त्याला संसदेतील 50 हून अधिक खासदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेतील शुन्य प्रहरात हा प्रस्ताव स्वीकारला. या प्रस्तावावर चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं. आता या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार असून त्याच दिवशी मतदान होणार आहे.