|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » सरकार पडणारच ! कोण म्हणते आमच्याकडे संख्याबळ नाही?-सोनिया गांधी

सरकार पडणारच ! कोण म्हणते आमच्याकडे संख्याबळ नाही?-सोनिया गांधी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्र सरकार विरोधात तेलुगू देसम पार्टीने अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी हा प्रस्ताव स्वीकारलाही आहे. मात्र मतदानावेळी हा प्रस्ताव टिकेल यावर शंका व्यक्त होत असतानाच ‘कोण म्हणते आमच्याकडे संख्याबळ नाही?,’ असा प्रश्न यूपीएच्या अध्यक्षा आणि ज्येष्ठ  काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांच्या या वक्तव्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात असून त्यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सोनिया गांधी यांनी हा सवाल केला. ‘तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणला. पण विरोधकांकडे संख्याबळ कुठे आहे?,’ असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर ’कोण म्हणते आमच्याकडे संख्याबळ नाही?,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दरम्यान, तेलुगू देसमने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून त्याच दिवशी मतदान होणार आहे. त्यामुळे या ठरावाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. मोदी सरकारविरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव आज लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे. काँग्रेस आणि टीडीपीच्या खासदारांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. पन्नास खासदारांचा पाठिंबा असल्यास अविश्वास प्रस्ताव दाखल करुन घेतला जातो. टीडीपी खासदारांनी दाखल केलेल्या प्रस्तावाला 50 पेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा असल्यानं लोकसभेच्या अध्यक्षांनी तो दाखल करुन घेतला. आता या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार आहे.