|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तुकोबांचे अश्व रिंगणी धावले…

तुकोबांचे अश्व रिंगणी धावले… 

अकलूज / दिलीप बनसोडे  /

अखंडपणे विठुनामाचा आणि तुकोबारायांचा गजर. अशामध्येच सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानात धुळ उडवित धावलेले तुकोबारायांचे अश्व आज लाखो वारकरी आणि अकलूजकरांनी याचि देही याचि डोळा अनुभवले. यावेळी सर्वांचीच ‘तुकोबांचे अश्व रिंगणी धावले….’ अशीच एकच भावना मनात होती.

पुणे जिल्हय़ातील सराटी येथे आज बुधवारी सकाळी संत तुकोबारायांच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आले. यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा निरा नदीचा पूल ओलांडून सोलापूर जिल्हय़ात आला. यावेळी अकलूज येथे सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि अकलूजकरांच्यावतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. 

येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या मैदानामध्ये नयनरम्य असे गोल रिंगण झाले. अत्यंत शिस्तबध्द असणाऱया वारकऱयांच्या या रिंगण सोहळय़ामध्ये प्रारंभी तुकोबारायांच्या अश्वाची माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी विधीवत पूजा केली.

अत्यंत चुरशीने काही सेकंदाच्या अवधीतच तुकोबारायांच्या दोन्हीही मानाच्या अश्वानी रिंगण धावून पूर्ण केले. एकीकडे घोडय़ांच्या टापांनी हवेत विरलेली धुळ. तर दुसरीकडे ज्ञानोबा-तुकोबांचा सामान्यांना उर्जा देणारा गजर यानिमित्ताने दिसून आला. अश्वानंतर पारंपारिक पध्दतीने विणेकरी, मृदंगकरी, डोक्यावर तुळस घेतलेल्या महिलांनी देखिल रिंगणाला फ्sढरी मारली. यावेळी अत्यंत जल्लोषामध्ये आणि शाही थाटात हा अपूर्व तुकोबारायांचा रिंगण सोहळा संपन्न झाला.

या तुकोबाच्या रिंगण सोहळयासाठी आणि स्वागतासाठी जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, शिवतेजसिंह मोहिते पाटील, आ. हणुमंत डोळस, नंदिनीदेवी मोहिते पाटील, जि. प. सदस्य स्वरूपाराणी मोहिते पाटील, पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, पोलिस अधिक्षक विरेश प्रभू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, प्रांताधिकारी शमा पवार, पोलिस उपअधिक्षक मंगेश चव्हाण आदी उपस्थित होते.

 

Related posts: