|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सोनालीच्या यशाला सोनेरी किनार

सोनालीच्या यशाला सोनेरी किनार 

प्रतिनिधी/ सातारा

शिवाजी उदय मंडळाची खेळाडू सोनाली हेळवी हिने कबड्डी क्रीडा प्रकारात अतुलनिय कामगिरी करत सातारा जिल्हय़ाचा नावलौकिक राज्यभरच नव्हे तर देशभर नेला आहे. नुकतेच तिच्या या यशस्वी कामगिरीचा गौरव परभणी येथे करण्यात आला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत सोनालीने हे यश मिळवले असून तिच्या या यशाला या सत्काराने सोनेरी किनार लाभली आहे.

18 व्या महाराष्ट्र दिनानिमित्त स्वर्गीय बुवा साळवी यांच्या स्मृतिपितर्थ आयोजित परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने परभणी येथे आयोजित कबड्डी दिनानिमित्त कार्यक्रमात सातारच्या सोनाली हेळवी हिला महाराष्ट्राच्या कुमारी गट कर्णधारपद उत्तमरित्या भूषविल्याबद्दल व महाराष्ट्रास कास्यपदक मिळवून दिल्याबद्दल 5000 रु रोख व सन्मान चषक प्रदान करण्यात आला, महाराष्ट्रातील गुणवान खेळाडू म्हणून तिची निवड करण्यात आली.  

    याप्रसंगी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पाटील, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पात्रीकर, सहकार्यवाहक आस्वाद पाटील, प्राचार्य उत्तमराव माने, संभाजी पाटील व मान्यवर उपस्थित होते. अवघ्या 19 वर्ष वयात कबड्डीच्या क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करण्यासाठी तिला शिवाजी उदय मंडळाची साथ लाभली. ही साथ आणि मार्गदर्शनामुळे देशपातळीवर तिला 10 वेळा कबड्डी संघात खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली. आयुष्यात तारेवरची कसरत करत आणि समोर उभी असणारी प्रतिकूल परिस्थितीचा सामना तिने जिद्दीने केला. आपली आई कस्तुरी रामचंद्र हेळवी ही मजुरी करते, हे तिचे कष्ट वाया जावून देणार नाही. असा निर्धार तिने केला होता. आणि या कबड्डी खेळाच्या माध्यमातून अनेक स्पर्धेत तिने 5 वेळा गोल्ड मेडल मिळवले तर 2 वेळा सिल्वर, 3 वेळा कास्य अशी पदक मिळवून यशाचा मार्ग निर्माण करत गेली आहे. सोशल मिडियाच्या विळख्यात अडकलेल्या तरूण-तरूणींसाठी सोनालीचे यश हे प्रेरणादायी आहे. तर खेळाडूंसाठी तिचा खडतर प्रवास हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली ही शिवाजी उदय मंडळात गुरूवर्य बबनराव उथळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिला राष्ट्रीय प्रशिक्षक शशिकांत यादव, समीर थोरात यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सोनालीचे क्लासवन ऑफिसर होण्याचे स्वप्न आहे. ती सातारा येथील कन्या शाळेत शिकत आहे. तिच्या या यशाचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे.