|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तिसऱया दिवशीही दूधबंद आंदोलन कायम

तिसऱया दिवशीही दूधबंद आंदोलन कायम 

प्रतिनिधी/ निपाणी

दुधाला पाच रुपये अनुदान देण्याच्या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभर सोमवारपासून आंदोलन हाती घेतले आहे. सीमाभागातील दूध संस्था, दूध उत्पादक शेतकऱयांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने दूध संकलन ठप्प झाले आहे. निपाणी परिसरात सोमवारपासून दूध संकलन ठप्प झाल्याने लाखो लीटर दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी आडी तसेच जैनवाडीत दूध उत्पादक शेतकऱयांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध केला.

दूध आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात कोणताही तोडगा न निघाल्याने बुधवारीही आंदोलन कायम राहिले आहे. त्यामुळे सीमाभागातूनही महाराष्ट्रात होणारा लाखो लिटर दुधाचा पुरवठा ठप्प झाला आहे. निपाणी परिसरातील शेकडो दूध संस्थांनी संकलन थांबवले आहे. मात्र मोठय़ा प्रमाणात दुधाचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांसमोर शिल्लक दुधाचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. घटलेल्या दूध दराचा सीमाभागातील दूध उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे.

मध्यंतरी गोकुळ दूध संघाने कार्यक्षेत्राबाहेरील दुधाच्या दरात चार रुपये कपात केली होती. तसेच गायीचे 30 टक्क्यांवरील दूध घेण्यास नकार दिला होता. याचा अजूनही सीमाभागातील दूध उत्पादकांना फटका सहन करावा लागत आहे. गेल्या महिन्याभरात निपाणी परिसरात शेकडो गायींची निम्म्या दरात विक्री करण्याची वेळ दूध उत्पादकांवर आली. तसेच अनेक कुटुंबांचा आधार बनलेला दूध उत्पादनाचा व्यवसायही अनेक ठिकाणी बंद पडल्याचे पहावयास मिळाले. या सर्वांचा रागही सीमाभागात दूध उत्पादकांच्या आंदोलनात दिसून येत आहे.

बुधवारी आडी येथे आडी व जैनवाडी येथील दूध उत्पादक शेतकऱयांनी रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. यावेळी दोन्ही गावातील ज्योतिर्लिंग दूध संस्था, दत्तगुरु, मल्लिकार्जुन दूध संस्था, आडी पूर्वभाग, जैनवाडी दूध उत्पादक संघ, श्री दत्त, गोधन व दत्तकृपा दूध संस्थांनीही दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यामुळे दोन्ही गावातील सुमारे तीन हजार लिटर दूध संकलन ठप्प झाले.

सीमाभागाकडे लक्ष देण्याची मागणी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याबरोबरच महाराष्ट्राप्रमाणेच सीमाभागातील दुधाला दर द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. दूधपुरवठा कमी असताना महाराष्ट्रातील दूध संघांनी सीमाभागातील दूध पुरवठय़ासाठी पायघडय़ा घातल्या होत्या. मात्र आता दूध जास्त झाले म्हणून सीमाभागातील दुधाचा दर कमी करणे, गायीचे दूध नाकारणे हा प्रकार चुकीचा असून महाराष्ट्राप्रमाणेच सीमाभागातील दुधालाही दर द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

पै. पाहूण्यांना दुधाचा पुरवठा

दरम्यान, सलग तीन दिवस दूध बंद राहिल्याने शिल्लक दुधाचे अनेक ठिकाणी दही, ताक, लोणी, श्रीखंड आदी पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेतला जात आहे. तसेच शहरातील पै. पाहुणे यांना दूध पुरवठा केला जात आहे. असे असले तरी दूध आंदोलनावर लवकर तोडगा न निघाल्यास परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related posts: