|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अश्रूनंतरचे रडगाणे आणि खासदारांना महागडे आयफोन

अश्रूनंतरचे रडगाणे आणि खासदारांना महागडे आयफोन 

गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा पक्षातर्फे सत्कार झाला. सत्कार समारंभात कुमारस्वामी यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भाषणादरम्यान ते थांबून थांबून अश्रू ढाळत होते. देशभरातील बहुतेक खासगी वाहिन्यांनी ही दृश्ये वारंवार दाखविली. चार-पाच दिवस राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून या अश्रूंवर चर्चाही झडली. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी तर कुमारस्वामी यांना ‘ट्रजिडी किंग’ ठरविले. कुमारस्वामी यांना रडताना पाहिले की जुन्या हिंदी सिनेमातील नायकाची आठवण येते. देशाला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या धाडसी नेतृत्वाची गरज आहे. कुमारस्वामी यांच्यासारख्या हळव्या मनाच्या नेतृत्वाची गरज नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. या अश्रूंवर काँग्रेस-निजद या मित्र पक्षातील नेत्यांनीही आपल्याला सुचेल व जमेल अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गेला आठवडाभर अश्रूंवरील चर्चा रंगली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प, कर्जमाफी अन्नभाग्य आदी योजनांबरोबरच पाऊस, पाणी आदी गौण ठरावे, अशा पद्धतीने अश्रूंवरच चर्चा सुरू आहे.

14 जुलै रोजी बेंगळूर येथील निजदच्या कार्यालयात पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा सत्कार झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कुमारस्वामी यांनी आपली अवस्था कर्णासारखी झाली आहे, असे सांगितले होते. या कार्यक्रमात माजी मंत्री व निजद नेते पीजीआर सिंदिया यांनी कुमारस्वामी कर्ण नव्हे तर धर्मराज आहेत, असे सांगून स्वतःला इतके खचू देऊ नका, असा सल्ला दिला होता. याच कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना कुमारस्वामी यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांच्या अश्रूला कोण कारणीभूत आहे, या एका प्रश्नाभोवती सध्या रडगाणे सुरू आहे. या अश्रूंना काँग्रेसचे असहकार्यच जबाबदार आहे, असा आरोप प्रमुख विरोधी पक्ष असणाऱया भाजपने तर केला आहेच, काँग्रेसमधील काही असंतुष्ट नेत्यांनीही त्यात सूर मिळविला आहे. मुख्यमंत्रीपदावर असणारा नेता जर जाहीरपणे अश्रू ढाळू लागला तर त्या राज्याची प्रतिमा काय होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आपण मुख्यमंत्री झालो तरी त्याचा आपल्याला आनंद नाही. कारण ज्या लोकांसाठी मी एका पाठोपाठ एक कल्याणकारी निर्णय घेतो आहे, तेच लोक अद्याप आपल्याला जवळ करत नाहीत, याची आपल्याला खंत वाटते. म्हणून आपण अश्रू ढाळले. आपल्याला राहावले नाही. प्रशासकीय निर्णय घेताना कठोरपणे निर्णय घेतो. एखाद्या भावनिक प्रसंगात सहजपणे आपल्या डोळय़ातून पाणी येते. कारण मी माणूस आहे, अशा शब्दात कुमारस्वामी यांनी आपल्या अश्रूंचे समर्थन केले आहे. काँग्रेसचा दोष नाही. त्यांचे तर आपल्याला सहकार्य आहे. लोकहिताचे निर्णय घेऊनही भाजप नेते आपल्यापासून लोकांना तोडण्यासाठी कुभांड रचत आहेत, असा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे.

कुमारस्वामी यांची ही अवस्था माजी पंतप्रधान देवेगौडा यांची चिंता वाढवणारी ठरली आहे. कारण दोन वेळा त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे वडिलांना साहजिकच आपल्या मुलाची काळजी वाटते. म्हणून या अश्रू प्रकरणानंतर देवेगौडा यांनी ‘तू केवळ सत्ता आणि तुझे आरोग्य सांभाळ. राजकारण काय करायचे, ते मी करतो’ असा सल्ला दिला आहे. वडील म्हणून मुलाची काळजी घेण्यासाठी देवेगौडा यांनी दिलेला सल्ला महत्त्वाचा आहेच. केवळ सल्ला देऊन देवेगौडा स्वस्थ बसणार नाहीत. युतीच्या राजकारणाची कमान ते स्वतः सांभाळू लागले आहेत. युतीमधील मतभेद किंवा इतर कोणताही विषय असो, देवेगौडा कधी काँग्रेसच्या राज्य नेत्यांबरोबर चर्चा करीत नाहीत. ते थेट राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधतात. हा थेट संपर्क स्थानिक नेत्यांसाठी तापदायक ठरू लागला आहे.

 समुद्रमंथनच्यावेळी निघालेले हलाहल भगवान शंकराने पचविले होते. आता युतीची सत्ता चालवताना आपल्यावरही हलाहल पचवून दुसऱयांना अमृत देण्याची वेळ आली आहे. आपली अवस्था भगवान शंकरासारखी झाली आहे, असे कुमारस्वामी म्हणू लागले आहेत. त्यांना विष कोणी पाजले, हा खरा चर्चेचा विषय आहे. कारण भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपल्यापेक्षा कमी संख्याबळ असूनही निजद नेत्यांच्या हातात संपूर्ण सत्ता सोपविणारे काँग्रेस नेते युतीवर खुश नाहीत. बाहेरून पाठिंबा आणि आतून कुरघोडय़ा सुरूच आहेत. एकीकडे युती सरकार कसे कोसळेल, याच्या प्रतीक्षेत असणारा विरोधी पक्ष आणि सत्तेत सहभागी असूनही कुमारस्वामी यांचे आरोग्य व मनःस्थिती या दोन्ही कशा बिघडतील, याची जातीने काळजी घेणारे असंतुष्ट काँग्रेस नेते. यामुळेच कुमारस्वामी अस्वस्थ झाले आहेत. मात्र, आपल्या अश्रूंचे खरे कारण उघड करता येत नाही, अशी त्यांची सध्याची स्थिती आहे. म्हणून जाहीरपणे ढाळलेल्या अश्रूंवरील चर्चेला विकास कामापेक्षाही अधिक महत्त्व मिळाले आहे.

खासदारांना महागडे आयफोन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी कर्नाटकातील खासदारांची नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री बैठक घेतात. आपल्या राज्याच्या समस्या मार्गी लावण्यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवावा, अशी यामागची अपेक्षा असते. यंदाची बैठक बुधवारी 18 जुलै रोजी झाली. मात्र, ही बैठक एका वेगळय़ा अर्थाने गाजत आहे. बैठकीच्या एक दिवस आधी 22 खासदार व राज्यसभेच्या 12 सदस्यांना सरकारकडून एक बॅग पाठविण्यात आली होती. मोची या ब्रँडेड कंपनीच्या बॅगमध्ये प्रत्येक खासदाराला 90 हजाराचा आयफोन भेटीदाखल पाठविण्यात आला. राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्र्यांना ही भेट परत पाठविली. काही खासदारांनी राजीव चंद्रशेखर यांच्याप्रमाणे आयफोन स्वीकारला नाही. तर काही जणांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देत महागडा फोन खिशात टाकला. एकीकडे शेतकऱयांच्या कर्जमाफीमुळे अवास्तव खर्चावर मर्यादा आणून राज्य चालवावे लागणार आहे, असे सांगणाऱया मुख्यमंत्र्यांनी खासदारांसाठी महागडा आयफोन भेटीदाखल देण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खासदारांना दिलेल्या आयफोनशी आपला संबंध नाही, असे सांगत कुमारस्वामी यांनी हात वर केले आहेत. युतीची बदनामी टाळण्यासाठी डी. के. शिवकुमार यांनी याची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘होय, स्वखर्चात आपणच खासदारांना आयफोन घेऊन दिले आहेत. यात वावगे ते काय?’ असा सवाल शिवकुमार यांनी केला आहे. ‘होय, कुणाचे काही बिघडत नाही, असा दिलदारपणा सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतही दाखवा’, असा सल्ला त्यांना राजकीय पक्षांचे नेते देऊ लागले आहेत.

Related posts: