|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भेंडीबाजार येथे अतिक्रमणाच्या तक्रारीबद्दल सर्वेक्षण मोहीम

भेंडीबाजार येथे अतिक्रमणाच्या तक्रारीबद्दल सर्वेक्षण मोहीम 

बेळगाव / प्रतिनिधी :

भेंडीबाजार येथील काही जागांमध्ये व्यवसायांचे अतिक्रमण झाल्याप्रकरणी मनपा यंत्रणेकडे सातत्याने तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याची दखल घेऊन या जागेच्या मोजमापासह सर्वेक्षणाची मोहीम गुरुवारी राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न काहींनी केल्यामुळे पुढील सर्वेक्षण पोलीस संरक्षणात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भेंडीबाजार येथील सदर जागेवरील अतिक्रमणाबाबत मनपाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर मनपा आयुक्तांनी जागा सर्वेक्षणाची सूचना केली. त्यानुसार नगररचना विभाग, भू-मापन खात्याचे अधिकारी यांचे पथक सर्वेक्षणासाठी दाखल झाले. त्यांनी येथील जागेचे मोजमाप नोंदविण्यास प्रारंभ केला. त्यानंतर या ठिकाणच्या काही व्यावसायिकांनी याला आक्षेप घेतला व सर्वेक्षण कशासाठी असा मुद्दा मांडला.

या ठिकाणी असणाऱया एका शाळेच्या विस्तारित भागाचे मोजमाप करण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, शाळेच्या कर्मचारीवर्गाने शाळेचे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे ही मोहीम अर्ध्यावरच थांबविण्यात आली.

सर्वेक्षणाच्या वेळी उद्भवलेल्या वादाच्या आणि आक्षेपाच्या प्रसंगामुळे पुढील सर्वेक्षण मोहीम पोलीस संरक्षणात करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.