|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘चक्काजाम’च्या पार्श्वभूमीवर सज्जता

‘चक्काजाम’च्या पार्श्वभूमीवर सज्जता 

जिल्हय़ात परिणाम नाही : जिल्हाधिकाऱयांची माहिती

प्रतिनिधी / ओरोस:

 ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये जिल्हय़ातील पुरवठा व वाहतूक व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हय़ातील वाहतुकीवर चक्काजाम आंदोलनाचा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले.

बैठकीला जिल्हाधिकाऱयांसह अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचे कर्मचारी उपस्थित होते.

 ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने या संपातून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळली आहे. त्यामुळे जिल्हय़ात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवणार नाही. तसेच या संपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज आहे. स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक 02362ा228847 असा आहे. संपामध्ये सहभागी न झालेल्या वाहतूकदारांना गरज भासल्यास पोलीस संरक्षण देण्यात येणार आहे. तसेच वाहतूकदारांना वाहतुकीबाबत काही समस्या असल्यास त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (02362-229050) संपर्क साधावा. प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून गरज भासल्यास एस. टी. च्या जादा गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. संप लांबल्यास जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवू नये म्हणून भाजीपाला व तत्सम वस्तूंच्या वाहतुकीसाठी एसटी सहकार्य करणार आहे. सध्या या चक्काजाम आंदोलनाचा जिल्हय़ामध्ये परिणाम जाणवत नसल्याने नागरिकांनी धास्तावण्याचे कारण नसल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. संप हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

Related posts: