|Saturday, February 22, 2020
You are here: Home » क्रिडा » लक्ष्य सेनचे ऐतिहासिक सुवर्ण

लक्ष्य सेनचे ऐतिहासिक सुवर्ण 

आशियाई कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण मिळवणारा भारताचा तिसरा खेळाडू

वृत्तसंस्था/ जकार्ता

भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करताना आशियाई कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत लक्ष्यने थायलंडच्या अग्रमानांकित कुनलावत धुव्वा उडवला. विशेष म्हणजे, गौतम ठक्कर (1965) व पीव्ही सिंधू (2012) यांच्यानंतर मानाची आशियाई कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. तसेच लक्ष्यच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे जेतेपद ठरले आहे. याआधी, त्याने याच स्पर्धेत 2016 मध्ये कांस्यपदक पटकावले होते.

जकार्ता येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत शनिवारी 16 वर्षीय लक्ष्यने इंडोनेशियाच्या चौथ्या मानांकित लिओनार्डोचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम फेरीत लक्ष्यसमोर थायलंडच्या जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित कुनलावत वितिदसरनचे आव्हान होते. पण, रविवारी भारताच्या या तरुण खेळाडूने शानदार खेळाचे प्रदर्शन करताना थायलंडच्या दिग्गज कुनलावतला 21-19, 21-18 असा धक्का देत जेतेपदाला गवसणी घातली.

प्रारंभी, पहिल्या गेममध्ये लक्ष्य व कुनलावत यांच्यात चांगली चुरस पहायला मिळाली. लक्ष्यने 10-6 अशी आघाडी घेतली होती. मात्र, अव्वल कुनलावतनेही जोरदार पुनरागमन करताना 13-13 अशी बरोबरी साधली. एकवेळ दोघांत 15-15, 18-18 अशी बरोबरी होती. पण, लक्ष्यने नेटजवळ सुरेख खेळ करत पहिला गेम 21-19 असा जिंकला. दुसऱया गेममध्ये कुनलावत लक्ष्यला चांगलीच टक्कर देईल, अशी आशा होती. पण, युवा लक्ष्यने दुसऱया गेममध्येदेखील जोरदार सुरुवात करताना 8-2 अशी आघाडी घेतली होती. यानंतर, दोघांत काही काळ एकेका गुणांसाठी संघर्ष पहायला मिळाला. अखेरीस, लक्ष्यने शेवटच्या क्षणी बाजी मारत दुसरा गेमही 21-18 असा जिंकला व जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

लक्ष्यच्या या यशानंतर क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड, भारतीय बॅडमिंटन महासंघ, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

पुरुष गटात 53 वर्षानंतर भारताला सुवर्ण

कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्यच्या रुपाने भारताला तब्बल 53 वर्षानंतर यश मिळाले. 1965 मध्ये भारताच्या गौतम ठक्कर यांनी शानदार कामगिरी करताना या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. यानंतर, एकाही भारतीय खेळाडूला या स्पर्धेत चमकदार कामगिरी करता आली नव्हती. 2012 मध्ये पीव्ही सिंधूने या स्पर्धेत यश मिळवले होते. विशेष म्हणजे, ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू ठरली होती

Related posts: