|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जीसीए व्यवस्थापकीय मंडळाला मुदतवाढ

जीसीए व्यवस्थापकीय मंडळाला मुदतवाढ 

 क्रीडा प्रतिनिधी / मडगाव

गोवा क्रिकेट संघटनेच्या काल रविवारी पर्वरी क्रिकेट अकादमीत झालेल्या खास आमसभेत क्लबांनी सध्याचे कार्यकारी अध्यक्ष सूरज लोटलीकर यांच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला मूदतवाढ दिली. खास आमसभेत काल हा ठराव संमत करण्यात आला. जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची मुदत 31 जुले रोजी संपणार होती.

बीसीसीआयचा ड्राफ्ट तयार होईपर्यंत संघटनेवर प्रशासक किंवा नवीन निवडणुका क्रिकेट संघटनांनी घेऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यानुसार काल खास आमसभेत प्रस्ताव आल्यानंतर विद्यमान समितीला मुदतवाढ मिळाली. निकाल लागेपर्यंत विद्यमान कार्यकारी मंडळाचा कार्यकाल असेल व त्यानंतर निवडणुका होतील.

बीसीसीआयकडून जीसीएला सूचना

गेल्या 10 सप्टेंबर रोजी पर्वरीत झालेल्या आमसभेत लोढा समितीने दिलेल्या शिफारसी मान्य करून त्या 15 सप्टेंबर रोजी बीसीसीआयकडे प्रशासकीय समितीकडे पाठविल्या होत्या. मात्र त्यांच्या कायदा विभागाने जीसीएला त्यात काही बदल करण्यास सांगितले. तशा आशयाचे पत्र 5 जानेवारी 2018 रोजी पाठविले. जीसीएची वेबसाईट ऍक्टिव्ह करणे तसेच विविध संघाच्या निवड समितीवर जीसीएच्या व्यवस्थापकीय मंडळाचा सदस्य असता कामा नये, हे दोन महत्वाचे मुद्दे बदलासाठी होते.

जीसीए कर्मचाऱयांवर अंकुश ठेवावा

सध्या जीसीएच्या काही कर्मचाऱयांमार्फत जीसीएचे नाव बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. कर्मचाऱयांनी आपल्या कामाकडे लक्ष द्यावे, असा सूर खास आमसभेत क्लबांच्या काही प्रतिनिधींनी व्यक्त केला. काहींनी तर जीसीएतील काही कर्मचाऱयांना केवळ चार महिनेच काम असते, उर्वरीत 8 महिने ते केवळ बसूनच असतात, याच्याकडे लक्ष वेधले. जीसीएचे काही कर्मचारी व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्यांविरूद्ध प्रसारमाध्यमांकडे बातम्या पिकवितात व ते क्रिकेटच्या दृष्टीने चांगले नाही, असाही सूर आमसभेत व्यक्त झाला. 

जीसीएचे सचिव दया पागी यांनी जीसीएच्या कर्मचाऱयांत जी शिस्त आणण्याचे धोरण अवलंबविले आहे त्यास आमचा पाठिंबा असून त्यानी त्या कामात आणखी सुसूत्रता आणावी, असे यावेळी डॉ. बबन परुळेकर म्हणाले. 

संलग्नीत क्लबांना मिळणार प्रत्येकी 1.5 लाख

गोवा क्रिकेट संघटनेकडून संलग्न क्लबांना देण्यात येणारे वार्षिक अनुदान मागील कित्येक वर्षांपासून बंद आहे. क्रिकेट हा खेळ महागडा असल्याने याचा परिणाम क्लबांवर झाला आहे. राज्यात होणाऱया विविध स्पर्धेत भाग घेणे तसेच क्रिकेट साधनसामुग्री घेण्याबाबतही आर्थिक बाबींमुळे क्लब्स सध्या विवंचनेत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी गोवा क्रिकेट संघटनेने ‘पॅटर्न ऑफ असिस्टन्स‘ तयार केले असून यात प्रत्येक क्लबला रु. 1.5 लाख देण्याचे ठरविले आहे.

आर्थिक मदत मिळण्यासाठी क्लबांना पॅन कार्ड करणे तसेच क्लबांना आयकर खात्याचा रिटर्न्स भरणेही आवश्यक आहे. खर्चाला त्या क्लबांच्या व्यवस्थापकीय मंडळाची व आमसभेची मंजूरी असणेही आवश्यक आहे. या शिवाय गोवा क्रिकेट संघटनेने युवा क्रिकेटला उत्तेजन देण्यासाठी 16 वर्षांखालील क्रिकेट संघाची निर्मिती करणाऱया व जीसीएच्या स्पर्धेत खेळणाऱया प्रत्येक क्लबला खास 50,0000 अनुदान देण्याचाही निर्णय घेतला असल्याचे सूरज लोटलीकर म्हणाले.

या आर्थिक अनुदानाचे दरवर्षी ऑडीट होणार असून क्लबांनी आपल्या खर्चाचा तपशील दरवर्षी 15 सप्टेंबरपूर्वी द्यावा लागेल. यातील 70 टक्के म्हणजे 1 लाख 5 हजार रक्कम क्लबांना क्रीडा साहित्य, किट्स, स्पर्धेसाठीचे प्रवेश शुल्क, जीसीएचे सदस्यत्व शुल्क, न्याहारी व जेवण, प्रवास तसेच क्रिकेट शिबिराच्या आयोजन तर उर्वरीत 30 टक्के रक्कम म्हणजे 45 हजार रक्कम क्लबासाठी कर्मचारी असेल तर त्याचे वेतन, व्यवस्थापकीय मंडळाचा रिप्रेशमेंट, स्टेशनरी तसेच ऑडीटसाठी खर्च करता येईल.

डॉ. केतन भाटीक यांचे कौतुक

यंदाची गोवा प्रीमियर लीग (जीपीएल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल डॉ. केतन भाटीकर यांचे कौतुक यावेळी करण्यात आले. संलग्नीत क्लबांच्या प्रतिनिधीनीं टाळय़ा वाजवून दाद दिली. सुमारे 80 लाखांहून अधिक या स्पर्धेसाठी खर्च झाला होता. जीसीएचा एकही पैसा न घेता या स्पर्धेचे आयोजन डॉ. भाटीकरनी केले व यासाठी ते निश्चितच कौतुकास पात्र असल्याचे यावेळी कार्यकारी सचिव दया पागी म्हणाले. आगामी जीपीएलची जबाबदारीही बहुदा डॉ. भाटीकर यांनाच देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.

Related posts: