|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुर्लातील बार कायम बंद करा

सुर्लातील बार कायम बंद करा 

दारुबंदीसाठी ग्रामसभेत एल्गार

 

प्रतिनिधी/ वाळपई

गेल्या 20 दिवसांपासून सुर्ला गावातील बार बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनाचे तीव्र पडसाद रविवारी झालेल्या खास ग्रामसभेतही दिसून आले. या सभेत केवळ महिन्याभरासाठी दारुबंदी काय कामाची? गाव कायमस्वरूपी दारुमुक्त करा, अशी जोरदार मागणी लावून धरत ग्रामस्थांनी एकजुटीचे दर्शन घडविले. गाव दारुमुक्त करण्याचा ठराव 201 विरूद्ध 10 मतांनी संमत करण्यात आला. गाव दारुमुक्त करा, अन्यथा गावाचे सुरक्षित जागेत स्थलांतर करा, अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली.

सुर्ल गावातील देवस्थानच्या सभागृहात ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा घेण्यात आली. पंचसदस्य सूर्यकांत गावकर, गोविंद कोरगावकर, उमेश गावकर, सत्यवान गावकर, लता गावकर, प्रजिता गावस, सचिव सर्वेश गावकर, ग्रामसेवक रामचंद्र देसाई आदी या ग्रामसभेला व्यासपीठावर उपस्थित होते. सचिव सर्वेश गावकर यांनी सर्वांचे स्वागत करून खास ग्रामसभेच्या आयोजनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सुर्ला गावातील ग्रामस्थांनी पंचायतीकडे लेखी निवेदन देऊन दारुबंदीच्या विषयावर खास ग्रामसभा गावातच घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत ही ग्रामसभा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उभे राहून हात उंचावत ठरावाला समर्थन

सुर्ला गावातील सर्व दारु दुकाने बंद करून गाव पूर्णपणे दारुमुक्त करावे असा ठराव मांडताच सभागृहात उपस्थित असलेल्या असंख्य ग्रामस्थांनी उभे राहून हात उंचावत या ठरावाला समर्थन दिले. उपस्थित असलेल्या बारमालकांनी ठरावाला विरोध करत आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी गाव 100 टक्के दारुमुक्त करण्याच्या मागणीवर जोर देत बारमालकांचे म्हणणे फेटाळून लावले. सरकारने केवळ महिन्याभरासाठी बारबंदी करून काहीही होणार नाही. संपूर्ण गाव कायमस्वरुपी दारुमुक्त करायला हवा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.

मद्यपींचा त्रास किती सहन करायचा : गावकर

दारुबंदीच्या ठरावाच्या बाजूने बोलताना अनेकांनी ग्रामसभेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. माजी पंचसदस्य तथा नागरी कृती समितीचे सदस्य संतोष गावकर यांनी गावात दारुबंदी किती गरजेची आहे, याबाबत विवेचन केले. हा छोटासा गाव असून मोजकीच कुटुंबे राहतात. पुरुषवर्गाला कामानिमित्ताने घराबाहेर पडून अन्यत्र जावे लागते. त्यामुळे घरात दिवसभर महिलाच असतात. गावात दारु पिण्यासाठी म्हणून कर्नाटक व अन्य भागातील मद्यपी मोठय़ा प्रमाणात येत असतात. मद्याच्या नशेत त्यांच्याकडून अनेकवेळा असभ्य वर्तन केले जाते. या मद्यपींचा त्रास अजून किती सहन करायचा?, असा सवाल त्यांनी व्यक्त केला.

पोलिसस्थानकापेक्षा बार बंदीची अधिक गरज

युवा कार्यकर्ते सचिन गावकर यांनीही गावात बारबंदीची मागणी लावून धरली. गावातील बारमुळे संपूर्ण गावच संकटात सापडला आहे. हे बार नसले म्हणून गावाचे कोणतेही नुकसान नाही, मात्र बारांमुळे गावात अनिष्ट प्रकार व व्यसनाधिनेला प्रोत्साहन मिळत आहे. त्यामुळे गाव दारुमुक्त होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. गणेश गावकर यांनीही गावातील महिलांचे संरक्षण करण्यासाठी दारुबंदीची गरज आहे. बारांमुळे आपल्या घरात तीन वाईट घटना घडल्या असून संपूर्ण गाव बरबाद होण्याआधी सरकारने गावाला दारुपासून मुक्त करावे. गावाला पोलीस स्टेशनची गरज नसून गावातील बार बंद करण्याची अधिक गरज आहे, असे ते म्हणाले. चंद्रकांत गावकर यांनी कायमस्वरूपी बारबंदी करण्याची मागणी केली.

महिलावर्गाकडून ठरावाचे जोरदार समर्थन

गंगा गावकर या महिलेने दारुमुळे गावात निर्माण झालेल्या समस्या मांडल्या. गावातील महिलांना बाहेरुन येणाऱया मद्यपींपासून संरक्षण देण्यासाठी बारबंदी महत्त्वाची आहे, असे त्या म्हणाल्या. गायत्री गावकर यांनी ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनामुळे गावात महिन्याभरासाठी बारबंदी लागू झाल्याने बारमालक वैफल्यग्रस्त झाले असून ते धमकी देत आहेत, अशी तक्रार व्यक्त केली. जानकी गावकर यांनी गावातील दारुबंदी केवळ महिन्याभरासाठी नव्हे तर कायमस्वरूपी करावी, अशी मागणी केली. पूनम गावकर या युवतीनेही गावातील बारमुळे गावात व्यवनाधिनता वाढत आहे. अनेक कुटुंबे यामुळे त्रस्थ असून बाहेरून येणाऱया मद्यपींचा त्रासही आया बहिनींना सहन करावा लागत असल्याची तक्रार केली.

बारमालक, ग्रामस्थांत बाचाबाची

दरम्यान आपले म्हणणे मांडताना गायत्री गावकर यांनी आंदोलक व कृती समितीच्या सदस्यांना बारमालकांकडून धमकावण्यात येत असल्याची तक्रार मांडल्यानंतर ग्रामसभेत उपस्थितांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी बारमालकांच्यावतीने सुशांत गावकर यांनी टिपणी केल्यामुळे जोरदार शाब्दिक चकमकही उडाली. बारमालक व ग्रामस्थ यांच्यात हमरीतुमरी झाल्याने तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला.

सरकार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे आभार

दारुबंदीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी उभारलेल्या आंदोलनाला सकारात्मक पाठिंबा दर्शविल्याबद्दल या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, आमदार प्रतापसिंह राणे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, उत्तर गोवा जिल्हाधिकारी लेविन्स मार्टिन, अबकारी आयुक्त, पोलीस निरीक्षक, पत्रकार यांचे खास आभार मानण्यात आले. या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला यश मिळत असून त्यांनी याहीपुढे असेच सहकार्य करण्याची आवाहनही करण्यात आले.

बारमालकांची विनंती ग्रामसभेने फेटाळली

बारमालकांच्यावतीने अशोक गावकर यांनी म्हणणे मांडले. बारबंदीमुळे गावातील 8 कुटुंबांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अटी व शर्तीच्या अधीन राहून गावात कोणत्याही अनिष्ट घटना घडणार नाहीत याची खबरदारी घेत किमान वर्षभरासाठी तरी बार चालू ठेवण्यास सुर्लावासियांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी ग्रामसभेत केली. दररविवारी बार बंद ठेवू, सण, उत्सव व शिमगोत्सवाच्या दिवसातही बार बंद ठेवू, वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी घेऊ, दारुची पार्सले देणे बंद करू व पार्टीच्या उद्देशाने गावात दाखल होणाऱया मद्यपींना रोखू, वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळू, अशी आश्वासनेही त्यांनी ग्रामसभेला देण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थित ग्रामस्थांनी हे सर्व पर्याय फेटाळून लावत कोणत्याही परिस्थितीत बार बंद झालेच पाहिजेत असा आक्रमक पावित्रा घेतला.