|Sunday, September 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » बिहारमध्ये नवा दारूबंदी कायदा

बिहारमध्ये नवा दारूबंदी कायदा 

पाटणा / वृत्तसंस्था :

बिहार विधानसभेत सोमवारी नवा दारूबंदी कायदा संमत झाला आहे. नव्या कायद्यात दारूबंदीच्या अनेक तरतुदी शिथिल करण्यात आल्या आहेत. याबद्दलचे विधेयक मांडताना मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी दारूबंदी गरीब माणसासाठी आणली गेली होती असा दावा गेला. गरीब लोक स्वतःच्या उत्पन्नाचा मोठा भाग दारूखरेदीवर खर्च करत असल्याने घरगुती हिंसाचार वाढला होता असेही नितीश यांनी म्हटले.

दारूबंदी कायदा गरीबांच्या भल्यासाठी लागू करण्यात आला होता असेही नितीश यांनी सांगितले. नितीश सरकारने काही दिवसांपूर्वी दारूबंदी विषयक कायद्यात अनेक महत्त्वाच्या बदलांना मंजुरी दिली होती. या बदलांमुळे एकेकाळी अत्यंत कठोर दिसणाऱया या कायद्याची तीव्रता आता पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. दारूबंदीबद्दल अत्यंत कठोर दिसून येणाऱया नितीश यांच्या या बदललेल्या भूमिकेचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. नितीश यांच्या नव्या भूमिकेवर विरोधकांनी सडकून टीका केली. तर कायद्याचा दुरुपयोग होत होता या त्यांच्या आरोपांना देखील पुष्टी मिळाली आहे.

दारूबंदीच्या आडून दलित तसेच मागासांना अटक करून त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप विरोधी नेते करत होते. बिहारमध्ये दारूबंदी कायदा लागू झाल्यावर आतापर्यंत 1.5 लाख जणांना अटक करण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी अबकारी कायद्याच्या दुरुपयोगाच्या तक्रारींची दखल घेत कायद्याद बदलाचे संकेत दिले होते.

2 ऑक्टोबर 2016 रोजी नवा अबकारी कायदा लागू केला असता तेव्हा याच्या काही तरतुदी अत्यंत कठोर असल्याचे स्पष्ट केले होते. तेव्हापासूनच कायद्याच्या गैरवापराच्या तक्रारी मिळत असल्याचे नितीश यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.