|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » बांगलादेशचा विंडीजवर 48 धावांनी विजय

बांगलादेशचा विंडीजवर 48 धावांनी विजय 

वृत्तसंस्था /प्रोव्हिडन्स, गयाना :

तमिम इक्बाल आणि शकीब अल हसन यांच्या विक्रमी द्विशतकी भागिदारीच्या जोरावर येथे रविवारी झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात बांगलादेशने यजमान विंडीजचा 48 धावांनी दणदणीत पराभव करत मालिकेत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशच्या शतकवीर तमिम इक्बालला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 बाद 279 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजने 50 षटकांत 9 बाद 231 धावा जमविल्या.

बांगलादेशच्या डावात सलामीच्या तमिम इक्बालने 160 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 130 धावा जमविताना शकीब अल हसन समवेत दुसऱया गडय़ासाठी 43 षटकांत 207 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी बांगलादेशचा सलामीचा फलंदाज अनामूल हक्क दुसऱयाच षटकांत खाते उघडण्यापूर्वी बाद झाला. शबीर रेहमानने 3 धावा जमविल्या. एम. रहीमने 2 षटकार आणि 3 चौकारांसह 30 धावा जमविताना तमिम इक्बालसमवेत चौथ्या गडय़ासाठी 54 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या डावात 5 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशच्या रहीमने शेवटच्या दोन षटकांत इक्बालसमवेत 43 धावा फटकाविल्या. होल्डर आणि रस्सेल यांची ही शेवटची षटपे महागडी ठरली. विंडीजतर्फे बिशूने 52 धावांत 2 तर रस्सेल आणि होल्डर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्त्यूउत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात हेटमेयरने 78 चेंडूत 5 चौकारांसह 52, सलामीच्या ख्रिस गेलने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 40, बिशूने 3 चौकारांसह नाबाद 29, जोसेफने 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 29, लेविसने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, कर्णधार हेल्डरने 1 षटकारांसह 17, रस्सेलने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 13 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 7 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे मुर्तर्झाने 37 धावांत 4, रेहमानने 35 धावांत 2, मिराज आणि हुसेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश 50 षटकांत 4 बाद 279 (तमिम इक्बाल नाबाद 130, शकीब अल हसन 97, एम. रहीम 30, बिशू 2/52, रस्सेल आणि होल्डर प्रत्येकी एक बळी),  विंडीज 50 षटकांत 9 बाद 231 (हेटमेयर 52, गेल 40, बिशू नाबाद 29, जोसेफ नाबाद 29, लेविस 17, होल्डर 17, रस्सेल 13, मुर्तर्झा 4/37, रेहमान 2/35, मिराज, रूबेल हुसेन प्रत्येकी 1 बळी).

Related posts: