|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » काळ चालला पुढे

काळ चालला पुढे 

काळ तर सतत पुढेच जात असतो. त्याच्या बरोबर जे जातात ते टिकून राहतात. जे जात नाहीत ते मागे पडतात. लोकांना अधूनमधून जुन्या काळात रमायला आवडत असले तरी पुढे जात राहणे अटळ असते. पुस्तके आणि वाचन संस्कृतीच्या बाबतीत असेच म्हणावेसे वाटते.

हल्ली वाचन कमी झाले आहे, पुस्तके कमी खपतात अशी ओरड सर्वत्र ऐकू येते. गंमत म्हणजे ही ओरड मी लहानपणापासून ऐकत-वाचत आलो आहे. पुस्तके खपत नाहीत अशी तक्रार लहानपणी ऐकू येई. त्यावर उपाय म्हणून विविध प्रकाशक स्वस्त पुस्तक योजना काढीत. खांडेकर-फडके-अत्रे-रणजीत देसाई अशा मातबर लेखकांची पुस्तके स्वस्त आवृत्तीच्या स्वरूपात आली. ती लोकांनी स्वीकारली. काळ बदलला तशी लोकांची आवडनिवड बदलली. पण काही लेखक सतत वाचकांना आवडत राहिले. पुण्यातल्या ‘पुणे नगर वाचन मंदिर’ आणि ‘पुणे मराठी ग्रंथालय’ येथून आम्ही पुस्तके आणत असू. पुणे मराठी ग्रंथालयाचा मी आजीव सदस्य झालो.

गेली काही वर्षे मी बघत आलो आहे की पुणे मराठी ग्रंथालयाची सदस्य संख्या बऱयाच प्रमाणात स्थिर झाली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात वाढायला हवी तितकी वाढली नाही. नव्या काळाची गरज म्हणून ग्रंथालयाने ई-वाचनालयाचा घाट घातला आहे. त्याला मात्र उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. काही दिवसांपूर्वी सांगली येथील नगर वाचनालयाला मी भेट दिली. एक लाखाहून अधिक ग्रंथसंग्रह असलेल्या या वाचनालयाला आता दीडशे वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्ताने तिथले पदाधिकारी अतिशय उत्साहाने विविध साहित्यविषयक उपक्रम आयोजित करीत आहेत.

नगर वाचनालयाचे पदाधिकारी श्री मुकुंदराव पटवर्धन यांना वाचनालयाच्या सदस्यसंख्येबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्टीकरणाचा जो मुद्दा मांडला तो पटण्याजोगा वाटतो. विविध शहरांची लोकसंख्या वाढली असली तरी ती शहरे विस्तारत गेली आहेत आणि वाढलेली लोकसंख्या वाचनालयांपासून दूर अंतरावर रहायला गेली आहे. वाढलेली अंतरे आणि वाहतुकीचे प्रश्न यामुळे दूरवरून रोज वाचनालयात येणे जाणे शक्मय नसते. शिवाय नव्या वातावरणात सांपत्तिक स्थिती सुधारल्याने दूर राहणारे नव्या पिढीतले वाचक वाचनालयात जाण्याऐवजी ऑनलाईन पुस्तक खरेदी करतात किंवा किंडलसारख्या उपकरणांवर ई-पुस्तके वाचतात. अनेक नवे लेखक स्वतः खर्च करून पुस्तके छापत आहेत. सोशल मीडियावर जोडलेल्या वाचकांना ती पुस्तके विकत आहेत किंवा भेट देत आहेत. तूर्तास तरी वातावरण आशादायक दिसते आहे.

Related posts: