|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आफ्रिकन देशांसाठी 10 सूत्री धोरण

आफ्रिकन देशांसाठी 10 सूत्री धोरण 

पंतप्रधान नरेंद्र मोदी युगांडाच्या दौऱयावर : संसदेला केले संबोधित, 20 कोटी डॉलर्सची मदत जाहीर

वृत्तसंस्था/ कम्पाला

 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युगांडाच्या संसदेला संबोधित करणारे भारताचे पहिले नेते ठरले आहेत. युगांडाच्या संसदेत तरुण खासदारांचे प्रमाण अधिक असून लोकशाहीसाठी हे सुचिन्हच असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत. आफ्रिकेतील देशांसोबत संबंधांना चालना देण्यासाठी मोदींनी यावेळी 10 सूत्री धोरण मांडले आहे.

प्राचीन सागरी क्षेत्रीय संबंध, स्वातंत्र्यासाठी संयुक्त संघर्ष, विभागलेल्या गेलेल्या जगात स्वतंत्र देश म्हणून मार्गक्रमण, नव्या संधींची सुरुवात आणि तरुण लोकसंख्येच्या आकांक्षांचा एकजिनसीपणा हे सर्व मुद्दे भारत आणि युगांडाला जोडणारे आहेत. आफ्रिकेचा महत्त्वाचा सहकारी असल्याबद्दल भारताला गर्व वाटतो. आफ्रिका खंडविषयक भारताच्या प्रतिबद्धतेच्या केंद्रस्थानी युगांडा देश आहे. युगांडाला 20 कोटी डॉलर्सची मदत भारत करणार आहे. यातील 14.1 कोटी डॉलर्स ऊर्जाक्षेत्रासाठी तर 6 कोटी 40 लाख डॉलर्स कृषी तसेच दुग्धोत्पादनांसाठी देण्यात आल्याचे मोदींनी सांगितले. सद्यकाळात भारताने 40 हून अधिक आफ्रिकन देशांना 11 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचे सहकार्य केले आहे. भारत आफ्रिकेतील कृषी क्षेत्राच्या विकासाकरता संयुक्तपणे काम करणार आहे. भारत आणि आफ्रिकन देशांचे संबंध 10 सूत्री धोरणांवर आधारित असतील, असे मोदींनी म्हटले.

1 आफ्रिका भारताच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर असून आफ्रिकेसोबतचे संबंध अधिक दृढ केले जातील. हे संबंध नियमित स्वरुपात वृद्धिंगत होणार आहेत.

2 आमची विकास भागीदारी प्राधान्याच्या आधारावर असेल. स्थानिक क्षमतेची निर्मिती आणि स्थानिक संधी निर्माण करण्यावर भारताचा भर असेल.

3 भारत तसेच आफ्रिकेतील देशांचे बाजार खुले आणि व्यापारअनुकूल करू. भारतासोबतचा व्यापार सुलभ करण्यासोबतच आफ्रिकेतील गुंतवणुकीला चालना दिली जाणार आहे.

4 भारताचा डिजिटल अनुभव आफ्रिकेच्या विकासासाठी उपलब्ध केला जाईल. सार्वजनिक सेवा सुधारण्यास भारत मोठी मदत करणार आहे.

5 आफ्रिकेकडे जगातील 60 टक्के कृषी भूमी असून तेथील उत्पादन केवळ 10 टक्के आहे. येथील कृषीविकासासाठी व्यापक सहकार्य केले जाईल.

6 भारत-आफ्रिकन देशांची भागीदारी हवामान बदल रोखण्यासाठी देखील काम करेल. याकरता संशोधनात्मक भागीदारी वृद्धिंगत केली जाईल.

7 दहशतवाद आणि कट्टरवादाची समस्या संपविण्यासाठी परस्परांना केले जाणारे सहकार्य वाढविण्याचे धोरण स्वीकारले जाणार आहे.

8 समुद्र खुला आणि मुक्त ठेवण्यासाठी भारत आफ्रिकन देशांसोबत काम करणार आहे. भारताचे नौदल याकरता थेट मदत करणार आहे.

9 आफ्रिका खंड पुन्हा शत्रुत्व इच्छांचे केंद्र होऊ नये, याकरता भारत व्यापक मदत करण्यास तयार आहे. 

10 न्यायसंगत, प्रतिनिधी आणि लोकशाहीवादी जागतिक व्यवस्थेसाठी भारत आणि आफ्रिकेतील देश मिळून काम करणार आहेत.

युगांडाच्या विकासासाठी प्रतिबद्ध

भारत-युगांडा बिझनेस फोरमला केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी भारत-युगांडा बिझनेस फोरमच्या बैठकीला संबोधित केले. मोदींनी युगांडाच्या विकासात मदतीसाठी प्रतिबद्धता दर्शविली. त्याचबरोबर त्यांनी एका विनोदाद्वारे भारताच्या प्रतिस्पर्धी देशांकडून स्वस्त सामग्री खरेदी करण्याचे तोटे देखील मांडले आहेत.

आफ्रिका संघर्षकाळाला सामोरा जात असताना कोणत्याही देशाला युगांडाची काळजी नव्हती, याचा इतिहास साक्षीदार आहे. केवळ भारतच त्या संकटाच्या घडीला युगांडासोबत उभा राहिला होता. मानवी मूल्यांसाठी भारताने त्या काळात पुढाकार घेतला होता, असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

वस्तू महाग असल्यास त्या दीर्घकाळ चालू शकतात, स्वस्त गोष्टी खरेदी केल्यास त्या खराब राहतील, कारण त्यांना दुरुस्त करणारा देखील त्याच देशातून आणावा लागेल. झिरो डिफेक्टसोबत आम्ही आमची यंत्रे आणि तंत्रज्ञान देण्यास तयार आहोत. ते प्रारंभीच्या काळात महाग वाटेल, परंतु वापरानुसार त्याचे महत्त्व पटत जाईल, असे मोदींनी बैठकीला संबोधित करत म्हटले.

युगांडाच्या लोकांची क्षमता विकसित व्हावी, कौशल्यविकास, मनुष्यबळाचा विकास व्हावा असे भारत इच्छितो. या सर्व शक्ती कोणीही तुमच्याकडून हिसकावू शकत नसल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

पैसा, घाम वाहण्यास तयार

नैसर्गिक संपदा वाढविण्याच्या प्रयत्नांशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही. युगांडाच्या हजारो एकर भूमीवर अद्याप रसायनाचा एक थेंबही पडलेला नाही. तेथील उत्पादन जगाचे लक्ष वेधून घेईल. आमचा घाम गाळून आणि पैसा खर्च करून युगांडाला लाभ मिळवून देण्याची इच्छा असल्याचे मोदी म्हणाले.