|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फिलीपाईन्समध्ये ‘बॅकअप सिटी’ची निर्मिती

फिलीपाईन्समध्ये ‘बॅकअप सिटी’ची निर्मिती 

न्यू क्लार्क सिटी : भूकंप अन् ज्वालामुखीपासून वाचण्यासाठी उपाययोजना : 12 लाख लोक राहू शकणार

वृत्तसंस्था / मनीला

 फिलीपाईन्समध्ये नैसर्गिक आपत्तींपासून पूर्णपणे सुरक्षित राहू शकेल, असे एक नवे शहर उभारले जात आहे. याला ‘न्यू क्लार्क सिटी’ नाव देण्यात आले असून राजधानी मनीलापासून हे शहर 100 किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर वादळ, पूर, भूकंपाचा धक्का तसेच ज्वालामुखी विस्फोटाच्या प्रसंगी देखील सुरक्षित राहू शकणार असल्याने याला बॅकअप सिटी संबोधिले जात आहे.

हे शहर सुमारे 95 चौरस किलोमीटर क्षेत्रात वसविले जात असून यात 12 लाख लोक राहू शकतील. 26 लाखांहून अधिक लोकसंख्येचा फिलीपाईन्स देश प्रशांत महासागराच्या ‘रिंग ऑफ फायर’मध्ये स्थित आहे. या भागातील देशांना भूकंप आणि ज्वालामुखी विस्फोटाचा धोका नेहमीच सतावत असतो.

वाहनांपासून होणारे प्रदूषण देखील आम्ही कमी करू इच्छितो. शहराचा बहुतांश हिस्सा पायी चालता येईल या हिशेबाने तयार केला जातोय. कारचा वापर कमी व्हावा याच दृष्टीने वाहतूक व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शहर निर्मितीचे काम 5 टप्प्यांमध्ये पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात 2 अब्ज डॉलर्सचा (13 हजार 775 कोटी रुपये) खर्च झाल्याची माहिती सरकारी संस्था बेसेस कन्वर्सेशन अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष आणि क्लार्क सिटी प्लॅनचे प्रमुख विविंसियो डिजोन यांनी दिली.

नैसर्गिक गोष्टींमुळेच संरक्षण

शहरात ऊर्जेसाठी हरितऊर्जा म्हणजेच सौर आणि द्रव्यीकृत नैसर्गिक वायूचा वापर होणार आहे. तसेच कचऱयापासून देखील वायू निर्मिती केली जाईल. वीजेचा वापर कमी व्हावा यादृष्टीने इमारतींची रचना करण्यात आली आहे. नदी, डोंगर, झाडे यांच्या रचनेत तसेच प्रमाणात शक्यतो बदल टाळण्यात आला. नवे शहर मनीलाच्या तुलनेत उंचीवर वसविले जात असल्याने त्याला पुराचा धोका नसेल.

नैसर्गिक आपत्तींचा धोका

न्यू क्लार्क सिटीच्या चहोबाजूने टेकडय़ा असल्याचे वादळापासून याचे नैसर्गिकरित्या संरक्षण होणार आहे. घरांच्या उभारणीसाठी काँक्रिटसोबतच्या ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱया राखेचा वापर केला जातोय. ही सामग्री ज्वालामुखीची तप्तता सहन करू शकेल. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱया अवशेषांना ‘लहर’ नाव देण्यात आले आहे. फिलीपाईन्सच्या जॉइंट टायफून वॉर्निंग सिस्टीमनुसार देशात दरवर्षी 19 चक्रीवादळे येतात. येथे 1600 पासून 2013 पर्यंत आलेल्या 11 अत्यंत भयंकर भूकंपांमध्ये सुमारे 7000 जणांना जीव गमवावा लागला आहे.