|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » आज ‘जिल्हा बंद’ची हाक

आज ‘जिल्हा बंद’ची हाक 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गेल्या दोन दिवसांपासून जिल्हय़ात रास्तारोकोच्या घटना घडत आहेत. 26 जुलैला ‘सिंधुदुर्ग बंद’ची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी जिल्हय़ात मनाई आदेश लागू केले आहेत.

गेल्या चार वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढला आहे. या मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या दोन वर्षांत मूक मोर्चे काढण्यात आले. परंतु शासनाकडून गंभीर दखल घेतली गेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चामार्फत आंदोलने सुरू झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी मराठा क्रांती मोर्चामार्फत अतिशय शांततेत मूक मोर्चे काढले गेले. परंतु आता मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोडीच्या घटना घडत आहेत. त्याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्हय़ातही उमटले आहेत.

जिल्हय़ात टायर पेटवून रास्तारोकोचे प्रकार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांमार्फत सभा घेऊन 26 जुलैला जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बंद यशस्वीतेसाठी बुधवारी जिल्हय़ातील
प्रत्येक विभागनिहाय बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. विशेषत: शाळा, महाविद्यालये, रिक्षा, एसटी, बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीच्या मुद्यावरून आंदोलन पेटल्यावर सिंधुदुर्गातही बंदची हाक देताच जिल्हाधिकाऱयांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये 7 ऑगस्टपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. पोलीस प्रशासनानेही संपूर्ण जिल्हय़ात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

 

दहावी, बारावीच्या परीक्षा होणार

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. गुरुवारी दहावीचे भूमिती आणि सामान्य गणितचे पेपर आहेत. बंद असला, तरी परीक्षा सुरू राहणार आहेत. मात्र, एसटी वाहतुकीवर परिणाम जाणवल्यास त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे.