|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » ठाण्यात मराठा आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारामागे शिवसेना पदाधिकारी

ठाण्यात मराठा आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारामागे शिवसेना पदाधिकारी 

ऑनलाईन टीम / ठाणे :

बुधवारी ठाण्यात झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी नितिन कंपनीजवळ रास्ता रोको आंदोलनाच्या दरम्यान दगडफेक, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे, दंगल माजविणे,चिथाविणे देणे आदी कलमांखाली शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे, शाखाप्रमुख अशोक कदम यांच्यासह 38 जणांविरुद्ध नौपाडा आणि वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. संपूर्ण ठाणे शहरात अशा 450 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन आणि बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाजया आंदोलकांना पोलिसांनीही आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अनेकांनी मुंबईचे आणि ठाण्याचे वेगळे आंदोलन असल्याचा दावा करीत ठिय्या आंदोलन सुरुच ठेवले. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी या सर्वांना आता आंदोलन स्थगित झाले आहे. रस्ता सुरळीत करा, असे आवाहन करुनही त्यांनी हटवादी भूमीका घेतली. त्यातच दंगलीचा भडका उडाल्याचे पोलिसांनी सांगितले. जमावाच्या दगडफेकीत नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार लामतुरे, उपायुक्तांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे आणि निलेश मोरे हे तीन अधिकारी जखमी झाले. या तिघांनाही उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पोलिसांवर नाहक दगडफेक झाल्यानंतर मात्र दोन ते अडीच तास संयम ठेवलेल्या पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला. त्यानंतरही आंदोलन सुरुच राहिल्यानंतर अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्याचे पोलिसांनी सांगितले.