|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिला तिरंदाजांची ‘गगन भरारी’

भारतीय महिला तिरंदाजांची ‘गगन भरारी’ 

 

वृत्तसंस्था/ कोलकाता

भारतीय महिला कम्पाऊंड संघाने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या जागतिक तिरंदाजी मानांकनात ही घोषणा करण्यात आली. अलीकडेच बर्लिन येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीमुळे जागतिक क्रमवारीत भारताला अव्वलस्थान प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात होणाऱया आशियाई स्पर्धेआधी भारतीय तिरंदाजी संघासाठी ही आश्वासक गोष्ट मानली जात आहे. तसेच पुरुष संघाची मात्र 12 व्या स्थानी घसरण झाली आहे.

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय महिला संघाने चिनी तैपेई संघाला पिछाडीवर टाकले. आता, भारतीय महिला कम्पाऊंड संघ 342.60 गुणासह अग्रस्थानावर आहे. तैपेई संघ 336.60 गुणासह दुसऱया तर कोलंबियाचा संघ 302.30 गुणासह तिसऱया स्थानावर आहे. गत आठवडय़ात बर्लिन येथील विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिलांनी रौप्यपदकाची कमाई केली होती. एप्रिलमध्ये अमेरिकेत झालेल्या विश्वचषक स्टेज 3 मध्ये भारतीय महिलांनी कांस्य जिंकले होते. या चमकदार कामगिरीमुळेच भारतीय महिलांना प्रथमच कम्पाऊंड प्रकारात अग्रस्थान मिळवता आले आहे. ज्योती सुरेखा, मुस्कान किर, दिव्या दहाल, त्रिशा देव, लिली चानू व मधुमिता यांनी भारतीय संघाला पहिले स्थान मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे.

पुरुष कम्पाऊंड संघ मात्र टॉप-5 मधून बाहेर पडला असून ताज्या क्रमवारीत 245.25 गुणासह भारतीय संघ सातव्या स्थानावर आहे. अमेरिकेचा संघ पहिल्या स्थानी असून दक्षिण कोरिया दुसऱया तर इटलीचा संघ तिसऱया स्थानी आहे. दरम्यान, भारतीय तिरंदाजी महासंघाने महिलांच्या कामगिरीचे अभिनंदन केले आहे.

ताजी सांघिक क्रमवारी (कम्पाऊंड प्रकार)

  1. भारत – 342.60
  2. चिनी तैपेई – 336.60
  3. कोलंबिया – 302.30
  4. अमेरिका – 284.55
  5. दक्षिण कोरिया – 281.62

 

रिकर्व्ह प्रकारात पुरुष व महिला संघाची घसरण

शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या यादीत रिकर्व्ह प्रकारात पुरुष व महिला संघाची घसरण झाली आहे. पुरुष संघ 12 व्या स्थानी असून महिला संघ आठव्या स्थानावर कायम आहे. वैयक्तिक गटातील रिकर्व्ह महिलांत दीपिका कुमारी सातव्या स्थानावर आहे.

 

 

Related posts: