|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » एसटी-दुचाकी अपघातात दोघे जखमी

एसटी-दुचाकी अपघातात दोघे जखमी 

खारेपाटण-मुटाट मार्गावर वायंगणी येथे अपघात

वार्ताहर / खारेपाटण:

खारेपाटण-मणचे या एसटी बस (एमएच 14 बीटी 2606) ची वायंगणी ताम्हणकरवाडी फाटय़ानजीक दुचाकीला धडक बसून दोघे दुचाकीस्वार जखमी झाले. जखमी झालेल्यांमध्ये यशवंत सुहास फाटक (21), तुषार सुहास फाटक (19) यांचा समावेश आहे. हा अपघात दुपारी 2.45 च्या सुमारास खारेपाटण-मुटाट रस्त्यावर घडला.

अपघाताची माहिती मिळताच, खारेपाटणचे वाहतूक नियंत्रक चंद्रकांत कांबळे, हवालदार प्रतिक जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार, खारेपाटण-मणचे बसचे चालक एम. व्ही. जाधव व वाहक एस. बी. पन्हाळकर हे मणचे येथे ही बस घेऊन गेले. तेथून ते एसटी बस घेऊन मागे परतत होते. वायंगणी-ताम्हणकरवाडी फाटय़ानजीक बस आली असताना हिरो होंडा कंपनीच्या दुचाकी (एमएच08 क्यू 3597) ची धडक एसटीच्या मागच्या चाकाजवळ बसली. यात दुचाकीचालक तुषार फाटक व मागे बसलेला यशवंत फाटक हे दोघेही गाडीवरून खाली पडले. यात यशवंत याच्या पायाला व मांडीला फ्रॅक्चर झाले. तर तुषारच्या उजव्या पायाला, जबडय़ाला गंभीर दुखापत झाली.

जखमींना तातडीने खारेपाटण आरोग्य केंद्रात खासगी गाडीने दाखल करण्यात आले. तेथे डॉ. जीतेंद्र मंडावरे यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कणकवली रुग्णालयात दाखल केले. कणकवली आगारातील नीलेश लाड यांनीही सायंकाळी खारेपाटण बसस्थानकाला भेट देत अपघाताची माहिती घेतली. अपघातात एसटीचे नुकसान झाले नसले, तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अधिक तपास हवालदार प्रतिक जाधव करीत आहेत.

Related posts: