|Monday, August 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » उद्यापासून मच्छीमार होणार समुद्रावर स्वार

उद्यापासून मच्छीमार होणार समुद्रावर स्वार 

जिल्हय़ातील साडेतीन हजार नौका मच्छीमारीसाठी सज्ज

पर्ससीन मच्छीमारांना सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षाच

मत्स्य अधिकारी आनंद पालव यांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

मच्छीमारीवर असलेल्या बंदीचा कालावधी मंगळवारी समाप्त होत असून 1 ऑगस्टपासून मासेमारीला सुरूवात होणार आहे. तब्बल दोन महिन्यांनी समुद्रावर स्वार होण्यासाठी जिल्हय़ातील साडेतीन हजार मच्छीमार नौका सज्ज असल्याची माहिती मत्स्य विभाग अधिकारी आनंद पालव यांनी दिली. दरम्यान, 1 ऑगस्टला अधिकृत मासेमारी सुरू होणार असली तरी 25 ऑगस्टला नारळी पौर्णिमेच्या मुहुर्तावरच खऱया अर्थाने मासेमारीला सुरूवात होणार आहे.

पावसाळा हा माशांच्या प्रजननाचा काळ असून अंडी देण्यासाठी मासे किनाऱयालगत येत असतात. त्यामुळे या काळात मासेमारी झाल्यास मत्स्यसाठय़ाबरोबर सागरी पर्यावरणही धोक्यात येते. यामुळे दरवर्षी 1 जून ते 31 जुलै अशी दोन महिने मासेमारी बंदी लागू केली जात आहे.

रत्नागिरी जिल्हय़ात सुमारे 40 बंदरे आहेत. या सर्व बंदरामध्ये मासेमारी बंद होती. या बंदीचा कालावधी मंगळवारी संपत असून बुधवारपासून नव्या मासेमारी हंगामाला प्रारंभ होत आहे. यासाठी मच्छीमारांना आपल्या नौका सज्ज केल्याची माहिती आनंद पालव यांनी दिली.

पर्ससीन नौकांवर राज्य शासनाने फेब्रुवारी 2016 पासून निर्बंध लागू केले. पर्ससीन बोटींना सशर्त मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच पर्ससीन बोटीचा मासेमारीचा हंगाम 1 महिना उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नव्या निर्णयानुसार 1 सप्टेंबरपासून आपल्या नव्या मासेमारी हंगामाचा शुभारंभ करण्यासाठी पर्ससीन नौकांना परवानगी देण्यात आली असली तरी मासेमारीसाठी पर्ससीन नौकांवर व्हीटीएस यंत्रणा गरजेची असल्याचे आदेश मत्स्य विभागाकडून देण्यात आले आहेत.

नारळी पौर्णिमेचाच मुहुर्त

नारळी पौर्णिमा हा मच्छीमार समाजाचा महत्वाचा सण मानला जातो. याच दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून दर्याराजाला सहकार्याचे विनंती करत मच्छीमार आपल्या व्यवसायाला सुरूवात करतात. यावर्षी नारळी पौर्णिमा 25 ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला मासेमारीला मुभा मिळाली असली तरी बहुसंख्य मच्छीमार 25 नंतरच समुद्रावर स्वार होण्याची शक्यता आहे.