|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » डॉक्टर बनण्यासाठी आलेले निघाले रुग्ण!

डॉक्टर बनण्यासाठी आलेले निघाले रुग्ण! 

प्रतिनिधी / मडगाव :

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ‘एमबीबीएस’ म्हणजेच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पहिल्या टप्प्यात 130 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यातील 20 जणांना रक्तदाब व दोघांना मधूमेह असल्याचे स्पष्ट झाल्याने गोमेकॉतील डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बुधवार दि. 1 ऑगस्टपासून गोमेकॉच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. त्यावेळी 20 विद्यार्थ्यांना रक्तदाब व दोघांना मधूमेह असल्याचे स्पष्ट झाले. ऐन तारूण्यांतील 18-19 वर्षातील मुलांना आरोग्याच्या तक्रारी असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे यावेळी या विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.

नव्या विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन

गोमेकॉत दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांना वरिष्ठांकडून मार्गदर्शन केले जाते. यंदाच्या अभ्यासक्रमांसाठी निवड झालेल्या 130 विद्यार्थ्यांना एका सभागृहात आपल्या पालकांसोबत बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ऐन तारूण्यांतील विद्यार्थ्यांना आरोग्याच्या तक्रारी असल्याबद्दल चर्चा झाली. मुलांनी चांगला आहार घेतानाच दररोज व्यायाम करण्यावर भर द्यावा, अशी सूचना देखील वरिष्ठांनी केली.

गोमेकॉत बनलाय चर्चेचा विषय

वैद्यकीय क्षेत्रात येणारे विद्यार्थी आरोग्याच्या तक्रारी घेऊनच आले. असा प्रकार पहिल्यांदाच आढळून आल्याने तो गोमेकॉत चर्चेचा विषय बनून राहिला आहे. बुधवारी 1 ऑगस्ट रोजी दक्षिण गोव्यात झालेल्या एका कार्यक्रमात यावर भाष्य झाले. मुलांच्या आरोग्यासंदर्भात पालकांनी देखील जागृत असायला पाहिजे, मुले कोणता आहार घेतात यावर लक्ष असायला पाहिजे. फास्ट फूडपासून मुलांना दूर ठेवण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला.