|Sunday, September 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पाकिस्तानातील धर्मवादी पक्ष

पाकिस्तानातील धर्मवादी पक्ष 

पाकिस्तानातील राजकारणाचे प्रामुख्याने तीन भाग झालेले दिसून येतात. लष्कराचा राजकीय प्रभाव, मध्यममार्गी राजकीय पक्ष, आणि धार्मिक पक्ष. यापैकी गेल्या दहा-पंधरा वर्षात तेथे धार्मिक पक्षांचा प्रभाव वाढतो आहे. त्यामुळे यावेळच्या संसदीय निवडणुकीत तेथे धार्मिक पक्षांचा प्रभाव कितपत अस्तित्वात आहे हे पाहणे महत्त्वाचे होते. निवडणुकीनंतर जे निकाल हाती आले आहेत, त्यानुसार या संदर्भात जो तपशील उपलब्ध झाला आहे तो पाकिस्तानच्या आजच्या स्थितीचे चित्र दर्शविणारा आहे. पाक राष्ट्रीय संसदेच्या निवडणुकीत यावेळी एकूण 12 धार्मिक पक्षांनी भाग घतला. निवडणुकीतील एकूण 5,29,82,922 मतांपैकी या साऱया धार्मिक पक्षांना एकत्रितपणे 52,03,285 मते मिळाली याचाच अर्थ त्यांच्या मतांची टक्केवारी 9.58 टक्के इतकी आहे. 2013 मधील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत धार्मिक पक्षांच्या मतांची टक्केवारी घसरली आहे. त्यांच्या जागाही कमी झाल्या आहेत. अर्थात यावरून पाक जनतेने धार्मिक पक्षांना नाकारले आहे असा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण राजकीय आखाडय़ात उतरलेल्या काही नव्या धार्मिक पक्षांना मतातून प्रतिसाद मिळाल्याचेही या निवडणुकीनंतर स्पष्ट झाले आहे. बरेलवी पंथाच्या धर्मगुरुनी, आलमा खदीम हुसेन रिझवी या आक्रमक व्यक्तिमत्त्वाच्या धर्मगुरुच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या ‘तेहरिक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या नव्या पक्षाने 22 लाखाहून अधिक मते मिळवून मतसंस्थेत पाचवा क्रमांक मिळवला आहे. याचप्रमाणे विविध धार्मिक पक्षांना एकत्रित घेऊन अलीकडेच मौलाना फजलूर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या ‘मुत्तहिदा मजलीस-ए-अमल’ या आघाडीने 25 लाख मतांसह संसदेच्या 12 जागाही जिंकल्या आहेत. मत संख्येत ही आघाडी चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र जमैत उलेमा-ए-पाकिस्तान (नुरानी) या धार्मिक पक्षाला 2013 च्या निवडणुकीच्या तुलनेत अर्ध्याहून कमी मते मिळाली आहेत. 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड यांच्या अल्लाह-ओ-अकबर तेहरिक पक्षास एकही जागा मिळाली नसली तरी निवडणुकीत 1,71,356 मते मिळाली आहेत. धार्मिक पक्षांचा या निवडणुकीतील मोठा सहभाग पाहून सिंध प्रांतातील नागरी समाज कार्यकर्ते, शिक्षक, लेखक आणि पुरोगामी विचारवंतानी मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांना, राष्ट्रीय पक्षांना या पक्षानी धार्मिक पक्षांचा पाठिंबा वा सहकार्य निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत घेऊ नये असे जाहीर आवाहन केले होते.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मुस्लीम लीग (राष्ट्रीय), पाकिस्तान पिपल्स पार्टी, इम्रानचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या मुख्य पक्षांच्या आतापर्यंतच्या राजकारणाकडे पाहिल्यास या साऱयाच पक्षांनी वेळोवेळी आपला धार्मिक कल दर्शविला आहे. मूलतत्त्ववादी, कडव्या धार्मिक गटांची पाठराखण केली आहे. धार्मिक  पक्षांचा कधी उघड पाठिंबाही घेतला आहे. याचाच अर्थ असा की, कटाक्षाने धर्मनिरपेक्ष राजकारण करणारा कोणताच पक्ष पाकच्या मध्यवर्ती राजकीय प्रवाहात आज अस्तित्वात नाही, अर्थात ज्या देशाची निर्मितीच मुळी द्वी राष्ट्रवादाच्या धार्मिक सिद्धांतावर झाली तेथे अशी स्थिती असणे स्वाभाविकच आहे. काही उदारमतवादी असे मत मांडतात की, ‘जिनांनी जरी पाकिस्तानची निर्मिती धार्मिक आधारावर केली असली तरी त्यांना स्वतंत्र पाकिस्तान हा धर्मनिरपेक्षतावादी असावा असे वाटत असे.’ या संदर्भात द्वी राष्ट्रवादी सिद्धांत स्वीकारणाऱया जिनांचे वर्तन कसे दुहेरी होते हे त्यांच्या भाषणातून व कृतीतून दिसून येते. त्यातून हे देखील दिसून येते की, जिनांना एकाचवेळी पाकिस्तान हा धर्मनिरपेक्ष आणि धार्मिक तत्त्वांवर आधारितही हवा होता. त्यांची भाषणे जर पाहिली तर ज्या श्रोत्यासमोर ते मत मांडीत त्या श्रोत्यांची पार्श्वभूमी पाहून त्या त्या वेळी कधी धर्मनिरपेक्ष तर कधी ईश्वरवादी, धार्मिक राष्ट्रांच्या बाजूने ते बोलत. पाकिस्तानच्या राज्यघटनेत शरीयतमधील ‘चांगल्या’ तत्त्वांचा अंतर्भाव असावा हे तत्त्वही त्यानी स्वीकारले होते. राष्ट्र निर्माणाच्या वेळीच अशी गोंधळाची स्थिती असल्याने पुढे पाकिस्तानची स्थिती अधिकच बिघडत गेली. सत्तरच्या दशकात लष्करी कटातून सत्तेवर आलेल्या झिया-उल-हक यांनी आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी, लष्करशाहीतील अत्याचारांचे उदात्तीकरण करण्यासाठी मुल्ला-मौलवीना हाताशी धरून धर्मवाद-मूलतत्त्ववाद पसरवला. आपल्या दुष्कृत्यांना धार्मिक अधि÷ान देण्याचा प्रयत्न केला. एका तऱहेने राजकीय इस्लामचा त्यांनी पाठपुरावा केला. बेनझीर भुत्तो यांच्या दुसऱयांदा सत्तेवर आलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी सरकारने नसिरूल्ला बाबर या निवृत्त जनरलला गृहमंत्री करून त्याच्यावर तालिबान्याना शस्त्रs व प्रशिक्षण देण्याची कामगिरी काबूलचा ताबा घेण्यासाठी सोपविली. त्यानंतर पाकिस्तानच्या सत्तेवर आलेल्या नवाझ शरीफांपासून परवेझ मुशर्रफपर्यंतच्या साऱयाच राज्यकर्त्यांनी मूलतत्त्ववादी, तालिबानी, दहशतवादी, कडवे धर्मवादी यांचा या ना त्या कारणाने वापर केला. या गटाना ‘सांभाळून’ घेतले. कधी शेजारील हिंदुस्थानचा बागुलबुवा, कधी अमेरिका-युरोपादी ख्रिस्ती राष्ट्रांच्या धार्मिक आक्रमणाची भीती पसरवून जनतेत धार्मिक कडवेपणा जोपासला व वाढवला. या साऱयाचा अटळ परिणाम म्हणून तेथे धर्मवादी राजकीय पक्षांची उल्लेखनीय वाढ झालेली दिसते. ताज्या निवडणुकीत धर्मवादी पक्षांची मत सरासरी घटली असा दिलासादायक निष्कर्ष बरेच जण काढून पाकविषयी काही आशा बाळगत असले तरी पाकिस्तानातील मुख्य प्रवाहातील धर्मनिरपेक्ष पक्ष कोणता हा प्रश्न उपस्थित केल्यास त्याचे समाधानकारक उत्तर मिळणे कठीण होईल अशी तेथील स्थिती आहे.

अनिल आजगावकर