|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ओबीसी आरक्षणाला धोका पोहोचता नये!

ओबीसी आरक्षणाला धोका पोहोचता नये! 

ओबीसी जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत मागणी

नोकरभरती थांबवू नका!

मराठा आरक्षणाला पूर्ण पाठिंबा!

जनगणनेनुसार ओबीसी, नवबौद्धांचाही सर्व्हे करा

प्रतिनिधी / कुडाळ:

मराठा आरक्षणाला ओबीसी समाजाचा पाठिंबा असताना समाजा-समाजात तेढ निर्माण करण्यासाठी काही विघ्नसंतोषी माणसे कार्यरत असून विनाकारण आमच्या बाबतीत गैरसमज पसरवून आम्ही मराठय़ांविरोधी आहोत, असा आभास निर्माण केला गेला. परंतु यापुढच्या काळातही मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आमचा पूर्ण पाठिंबा असेल. परंतु ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धोका पोहोचता नये व नोकरभरती थांबवू नये. तसेच जनगणनेनुसार ओबीसी व नवबौद्धांचाही सर्व्हे करा, या आमच्या प्रमुख मागण्या राहतील, असा ठराव ओबीसी जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत करण्यात आला, अशी माहिती सुनील भोगटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व ओबीसी जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक झाली. मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाल्यापासून या आंदोलनाला ओबीसी समाजाचा पाठिंबा होता. किंबहुना आंदोलनात सहभाग होता. परंतु मराठा समाजातील काही अतिउत्साही मंडळींनी आम्ही मराठा समाजाच्या विरोधात आहोत, अशी वक्तव्ये केली. त्यामुळे गेले काही दिवस समाजा-समाजामध्ये दरी निर्माण झाली आणि संघर्ष अटळ झाला. या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटनांच्या बैठकीत समाचार घेताना काही ओबीसी समाजातील तरुणांवर हमरा-तुमरीची भाषाही झाली. अशावेळी सामंजस्याने वाद मिटला असता. तरीही आंदोलन संपल्यानंतर आमच्या समाजातील लोकांच्या दुकानासमोर घोषणा देऊन भडकविण्याचे प्रकार निंदनीय होते, असे या पत्रकात म्हटले आहे.

11 रोजी ओबीसी कार्यकर्ता सभा

यापुढच्या काळात ओबीसी समाज जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात म्हणजे 52 टक्के आहे. म्हणूनच 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता माध्यमिक शिक्षक पतपेढी (ओरोस) सभागृहात सर्व ओबीसी कार्यकर्ता सभा आयोजित केली आहे. या सभेत ओबीसी आरक्षित महासंघ मजबूत करणे व ओबीसी जातनिहाय जनगणना करणे, सध्या सुरू असलेली नोकरभरती शासनस्तरावर रद्द करण्यात येऊ नये. आमच्या आरक्षणाला धोका पोहोचू नये. जातपडताळणी समिती एकच असावी, अशा प्रमुख मागण्या जिल्हाधिकाऱयांकडे निवेदन देऊन करण्यात येणार आहेत.

लवकरच महामेळावा

जिल्हय़ातील आरक्षित समाजासाठी ओबीसी, एससी, एनटी, एसबीसी, व्हिजे, एनटी-2 अशा समाजातील जिल्हय़ातील समाजाचा महामेळावा ओबीसी समाजाचे राज्यस्तरावरील नेते व मंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

बालिश विधाने कितपत योग्य?

व्यापारी संघटनेने मराठा समाजाच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला असताना काहींच्या दुकानांची डागडुजी सुरू होती. त्यावेळी शटर ओढणे व काही विपरित बोलणे हे योग्य नव्हे. परंतु वैश्यवाणी आपले विरोधक आहेत, असा गैरसमज करून वाण्यांच्या दुकानात आपल्या समाजाने जाऊ नये, अशी बालिश विधाने केली. हे कितपत योग्य आहे? असा सवाल बैठकीत करण्यात आला. अशाप्रकारची दरी समाजा-समाजामध्ये होता नये, असे आवाहन करण्यात आले.

जिल्हय़ाची संयोजक समिती स्थापन

सिंधुदुर्ग जिल्हा आरक्षित समाज महासंघ स्थापन करून जिल्हय़ाची संयोजक समिती स्थापन करण्यात आली. यात भंडारी समाज जिल्हाध्यक्ष अतुल बंगे, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, सुतार समाज जिल्हाध्यक्ष आनंद मेस्त्राr, चर्मकार समाज जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, बौद्ध समाजाचे महेश परुळेकर, प्रा. संदीप कदम यांची नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण जिल्हाभर फिरून आरक्षित समाजाला एका झेंडय़ाखाली आणून संघटीत राहण्याचे ठरविण्यात आले.

कुडाळ नगराध्यक्ष हे स्वाभिमान पक्षाचे!

कुडाळ नगराध्यक्ष मराठा समाजाचा म्हणून काही समाजातील लोकांना पोटशूळ येतो, अशी वक्तव्ये केली गेली. मात्र, कुडाळचे नगराध्यक्ष समाज म्हणून झाले नसून माजी मुख्यमंत्री नारायण राणे व त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष आहेत. त्यामुळे नगराध्यक्षांचा जातीपातीच्या राजकारणात बळी जाऊ देऊ नका, असा सल्ला देण्यात आला.

अतुल बंगे, सुनील भोगटे, आनंद मेस्त्राr, सावळाराम अणावकर, नंदन वेंगुर्लेकर, रामचंद्र भोई, संदीप कदम, महेश परुळेकर, अभय शिरसाट, रावजी यादव, सुधीर चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, सुनील डुबळे, चंदन वेंगुर्लेकर, राजू गवंडे व इतर उपस्थित होते.