|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » केळशी कुठ्ठाळी ग्रामस्थांची केसरव्हाळ झरा परीसरात स्वच्छता मोहिम

केळशी कुठ्ठाळी ग्रामस्थांची केसरव्हाळ झरा परीसरात स्वच्छता मोहिम 

वार्ताहर/  झुआरीनगर

सेव्ह केसरव्हाळ स्प्रिंग मुव्हमेंट या कुठ्ठाळी केसरव्हाळ येथील झऱयाच्या ठिकाणी येणाऱया नियोजित तीन तारांकीत हॉटेल प्रकल्पाला विरोध करणाऱया संघटनेने कुट्ठाळी व केळशीतील ग्रामस्थांना सोबतीला घेऊन झऱयाच्या ठिकाणी साफसफाई केली. झऱयाच्या ठिकाणी हॉटेल प्रकल्प येऊ देणार नसल्याचे यावेळी संघटनेने व ग्रामस्थांनी स्पष्ट केले.

   रविवारी दुपारी साडे तीन वाजता कुठ्ठाळी व केळशी गावातील लोक केसरव्हाळच्या झऱयाच्या ठिकाणी एकत्र आले होते. सेव केसरव्हाळ स्प्रिंग मुव्हमेंट या संघटनेने झऱयाच्या परीसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. केळशीच्या सरपंच मारीया डिसोजा, माजी उपसरपंच सेबी फेर्राव, संघटनेचे निमंत्रक पोब्रीक वाझ,  माजी सरपंच विन्सेंट परेरा, जोकीम फर्नांडिस, लोपीनो कार्दोज व इतर मान्यवरांसह केळशी व कुठ्ठाळीतील ग्रामस्थ या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी केसरव्हाळ झऱयाचा परीसर तसेच या झऱयाकडे जाणारी पायवाट झाडे झुडपे हटवून मोकळी केली. त्यांनी परीसरात स्वच्छता केली.

   स्वच्छता मोहिमेनंतर संघटनेने घेतलेल्या पत्रकार परिषदेत झऱयाच्या ठिकाणी तारांकीत हॉटेल प्रकल्प बांधून झऱयाचे अस्तित्व नष्ट होऊ दिले जाणार नाही. स्थानिक जनतेला हा झरा प्रीय आहे, या झऱयाशी लोकांचे आपुलकीचे नाते आहे. त्यामुळे तारांकीत हॉटल प्रकल्प नको असे संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सांगितले. सुशोभिकरण किंवा संवर्धन करायला ग्रामस्थांचा विरोध नाही. परंतु पर्यटन विकास महामंडळाने स्थानिक पंचायतीला किंवा ग्रामस्थांना विश्वासत न घेता झऱयाचे अस्तित्वच मिटवण्याचा डाव रचला असल्याचा संशय जोकीम फर्नांडिस यांनी व्यक्त केला. विधानसभेत पर्यटनमंत्र्यांनी हॉटेल प्रकल्पाला लोकांचा विरोध नसल्याचा खोटा दावा केलेला असल्याचे त्यांनी सांगितले. लोपीनो वाझ यांनी केसरव्हाळच्या झऱयाच्या परीसरात तारांकीत हॉटेल प्रकल्पाला विरोध करणारा ठराव केळशी ग्रामसभेने घेतलेला असल्याचे स्पष्ट केले. झऱयाच्या परीसरातील जमीन कोमुनिदादची असून  गोवा पर्यटन महामंडळाला ही जमीन कोमुनिदादने केवळ सुशोभीकरणासाठी दिली होती. मात्र आता हॉटेल प्रकल्प महामंडळ आणू पाहात आहे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. माजी सरपंच विन्सेन्ट परेरा यांनीही आपण सरपंचपदी असतानाच ही जमीन सुशोभिकरणासाठी महामंडळाकडे दिली होती असे स्पष्ट करून त्यांनी त्यावेळी हॉटेल प्रकल्पाचे कारण नव्हते असे सांगितले. स्थानिक नागरीक लॉरेन्स वाझ यांनी यावेळी सरकारच्या निर्णयावर टीका केली.

Related posts: