|Thursday, December 5, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फर्मागुडी टेकडीवर महिलेचा खून

फर्मागुडी टेकडीवर महिलेचा खून 

ओळखीसाठी बेपत्ता महिलांची माहिती देण्याचे आवाहन

प्रतिनिधी/ फोंडा

कदंब बसस्थानक-फर्मागुडी येथील टेकडीवर खून केलेल्या अवस्थेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला आहे. काल सोमवारी दुपारी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. फर्मागुडी येथून कदंब बसस्थानकाकडे येणाऱया रस्त्याला लागूनच असलेल्या टेकडीवर निर्जनस्थळी हा मृतदेह सापडला. गळा आवळून खून केल्यानंतर तिची ओळख पटू नये यासाठी डोक्यावर दगड घालून चेहरा विद्रूप करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे.

याप्रकरणी फोंडा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.  शवचिकित्सा अहवालानंतर हा खून नेमका कसा करण्यात आला व खुनापूर्वी तिच्यावर बळजबरी करण्यात आली होती का? हे स्पष्ट होणार आहे.

अळंब्यांसाठी गेलेल्यांना दिसला मृतदेह

फर्मागुडी येथील या टेकडीवर अळंबी शोधण्यासाठी गेलेल्या दोघा व्यक्तींच्या नजरेस हा मृतदेह पडला. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या उपक्रमासाठी डोंगरावर खोदण्यात आलेल्या एका छोटय़ा खड्डय़ात हा मृतदेह झाडाची पाने टाकून लपवून ठेवण्यात आला होता. खून झालेली महिला अंदाजे 30 ते 40 वयोगटातील असून  मृतदेहाच्या बाजूलाच एक दगड, तिच्या अंगावरील कपडे व अन्य काही वस्तू सापडल्या आहेत. खून करण्याच्या उद्देशानेच या महिलेला याठिकाणी आणले होते, की त्यामागे अन्य कुठले कारण असावे याचा पोलीस शोध घेत आहेत.

बेपत्ता महिलांची माहिती देण्याचे आवाहन

सदर महिलेचा एकंदरीत पेहराव पाहिल्यास ती मजूर वर्गातील असण्याची शक्यता आहे. खुनाचा तपास लावण्यासाठी तिची ओळख पटविणे गरजेचे आहे. फोंडा किंवा आसपासच्या परिसरातून एखादी महिला बेपत्ता असल्यास त्यासंबंधी माहिती देण्याचे आवाहन फोंडा पोलिसांनी केले आहे.

घटनास्थळावर सापडले अनेक पुरावे

सोमवारी दुपारी 3 वा. सुमारास या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. उपअधीक्षक महेश गावकर व निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाच्या मदतीने तपासकार्यांला आवश्यक असलेले महत्त्वाचे पुरावे घटनास्थळावरुन गोळा करण्यात आले आहेत. उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर, राहूल धामशेकर, परेश सिनारी व इतर पोलीस पथकाचा तपासकार्यांत सहभाग होता.

दरम्यान 1 मे 2012 रोजी याच डोंगर टेकडीवर अशाचप्रकारे एका महिलेचा मृतदेह खून झालेल्या अवस्थेत आढळला होता. गळा चिरुन तिचा खून करण्यात आला होता. या महिलेची ओळख पटू न शकल्याने या खुनाचा तपास अद्याप लागलेला नाही. सोमवारची घटना व सहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेमध्ये बरेच साम्य आहे.

Related posts: