|Monday, December 9, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ऑक्टोबरमध्ये इटली पंतप्रधान भारत दौऱयावर

ऑक्टोबरमध्ये इटली पंतप्रधान भारत दौऱयावर 

अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा : तंत्रज्ञान परिषदेत घेणार कोंटे सहभाग

वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली

इटलीचे पंतप्रधान जिएसेपे कोंटे ऑक्टोबरच्या अखेरीस भारताच्या दौऱयावर येणार आहेत. जुलैमध्ये इटलीत आघाडी सरकारचे प्रमुख झाल्यावर त्यांचा हा पहिला भारत दौरा असणार आहे. त्यांच्या दौऱयादरम्यान भारतात 29-30 ऑक्टोबर या कालावधीत 24 व्या तंत्रज्ञान परिषदेचे आयोजन केले जाणार असून इटली यात सहभागी देश असणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतून एक मोठे शिष्टमंडळ भारतात येणार आहे.

कोंटे यांचा दौरा हा कोणताही राजकीय प्रवास नसला तरीही दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. या चर्चेवेळी स्थलांतर विषयक मुद्यांसह अनेक परस्पर हितसंबंध असणाऱया क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यावर विचारविनिमय होऊ शकतो. सद्यकाळात इटलीतून भारतात होणारी गुंतवणूक केवळ 2.5 अब्ज डॉलर्स इतकी असून जी वाढण्यास मोठा वाव आहे.

इटलीकडून होणारी गुंतवणूक ही प्रामुख्याने ऑटो, ट्रेडिंग, सेवा आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात झाल्याचे आढळून येते. दोन्ही देशांदरम्यान रेल्वे, नूतनीकरणीय ऊर्जा, डिझाइन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित तंत्रज्ञान, पॅकेजिंग इत्यादी क्षेत्रांमधील सहकार्य वाढविले जाऊ शकते.

दोन्ही देशांच्या संबंधांदरम्यान काही प्रमाणात कटूता असताना पंतप्रधानांचा हा दौरा होतोय. इटलीच्या नौसैनिकांना झालेली अटक आणि मायदेशी परतल्यावर ते भारतात पुन्हा न आल्याने दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते. याचप्रकारे एका संरक्षण व्यवहारात कथित घोटाळय़ावरून दोन्ही देशांमधील कटूता वाढली होती. नौसैनिकांचे प्रकरण आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले आहे.

इटलीचे पंतप्रधान कोंटे नवी दिल्लीत आयोजित तंत्रज्ञान परिषदेचे अनावरण करतील. या परिषदेच्या आयोजनस्थळावरच इटलीचे एक प्रदर्शन आयोजित केले जाईल. इटलीच्या शिष्टमंडळात वारसास्थळांची सफाई आणि संवर्धनात प्राविण्य राखणाऱया तज्ञांचा समावेश आहे. भारतातील ताजमहालच्या संवर्धनाबद्दलचा प्रकल्प प्राप्त करण्यावर इटलीच्या कंपनीचा भर असणार आहे.

Related posts: