|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पानी फौंडेशनच्या कामामुळे यंदा तालुक्यात एकही टँकर नाही

पानी फौंडेशनच्या कामामुळे यंदा तालुक्यात एकही टँकर नाही 

प्रतिनिधी/ जत

पानी फौंडेशनच्या सत्यमेव जयते वाँटरकप स्पर्धा 2018 मध्ये जत तालुक्यातून सहभागी झालेल्या व चांगल्या प्रकारे जलसंधारणाचे काम केलेल्या गावांचा सन्मान व कामांमध्ये प्रत्यक्ष श्रमदान किंवा अर्थसहाय्य केलेल्या नागरिकांचा जलरत्न म्हणून गौरवण्याचा कार्यक्रम तलाठी भवन कार्यालय, जत येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले की, मागील तीन वर्षापासून दुष्काळी जत तालुक्यात पानी फौंडेशनचे काम सुरू असून दरवर्षी उन्हाळयात तालुक्यातील बऱयाच गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. परंतु चालवर्षी पाऊस कमी प्रमाणात होऊनही अजून एकाही गावाला टँकरची गरज भासली नाही. याचे सर्व श्रेय पानी फौंडेशन व तालुक्यातील ग्रामस्थांनाच जाते. त्यामुळे ग्रामस्थांचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.

यावेळी बोलताना आमदार विलासराव जगताप म्हणाले की, आपल्या दुष्काळी जत तालुक्यातील जनतेने दुष्काळ हटविण्याचा जणू विडाच उचललेला असून आवंढी सारख्या गावात दीड हजार लोक श्रमदानासाठी असायचे अगदी स्वत:चे शेत देखील कधी न पाहिलेल्या लोकांनी महिलांनी श्रमदानात मोठय़ा प्रमाणात सहभाग नोंदविला होता. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन आवंढी व बागलवाडी गावांना भेटी देऊन श्रमकर्त्यांना शाब्बासकी देऊन प्रोत्साहन दिले.

यावेळी तहसीलदार अभिजीत पाटील यांनीही नागरिकांचे कौतूक करून यापुढेही पानी फौंडेशनच्या कामासाठी लागेल ती मदत करावयास प्रशासन तयार  असल्याची हमी दिली. कार्यक्रमात गावांच्या प्रतिनिधींना, पत्रकारांना शासकीय कर्मचाऱयांना जलरत्नांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सभापती सौ. मंगलताई जमदाडे, सुनील पवार, जि. प. सदस्य सरदार पाटील, प्रभाकर जाधव, तालुक्याच्या गावागावातील नागरीक, शासकीय कर्मचारी, भारतीय जैन संघटनेचे पाटील, जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख उपस्थित होते.

 कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तुकाराम पाटील यांनी केले. सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी तर आभार विभुते यांनी मानले.

 

Related posts: