|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीतील युवकाच्या संशोधनाची मोदींकडून प्रशंसा

सांगलीतील युवकाच्या संशोधनाची मोदींकडून प्रशंसा 

मानसिंगराव कुमठेकर/ मिरज

सांगलीतील युवा संशोधक महेश माधव गोगटे यांनी वाराणसीतील विविध जलाशय आणि नद्यांमधील जलप्रदूषणावर केलेल्या संशोधन प्रकल्पाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली असून, हा प्रकल्प गंगा शुद्धिकरण प्रकल्पासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महेश गोगटे यांनी जपान येथील क्योटो विद्यापीठात संशोधक म्हणून कार्य केले आहे.

महेश गोगटे यांनी वाराणसीतील अत्याधिक प्रदूषित जलाशयांवर सलग तीन वर्षे अभ्यास करुन हे प्रदूषण कसे दूर करता येईल, याबाबत काही निष्कर्ष आणि सुचना आपल्या संशोधनातून मांडल्या आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विदेशी भाषा संस्थेच्या जपानी भाषा विभागात ते कार्यरत आहेत. गोगटे हे मूळचे सांगली येथील आहेत. बँकींग विषयातील तज्ञ डॉ. माधव गोगटे यांचे ते सुपुत्र आहेत. गोगटे यांनी जपानमधील क्योटो विद्यापीठात आशियान आणि अफ्रिकन स्टडीज् विभागात विद्यार्थी संशोधक म्हणून काम केले आहे. या विभागात अभ्यास करताना त्यांनी भारतातील जलप्रदूषणाचा विषय निवडला होता. त्यासाठी वाराणसीतील कुंडा, पोखारा आणि पुष्करणी या सर्वाधिक प्रदूषित जलाशयाची निवड अभ्यास विषय म्हणून केली होती. सन 1794 ते 1947 या वसाहत वादाच्या काळात या जलाशयांमध्ये कोणते कोणते बदल झाले, याचा अभ्यास त्यांनी केला होता. भारतातील सर्वाधिक प्रचीन शहर असणाऱया आणि गंगानदीच्या पवित्र किनाऱयावरील सांस्कृतिक आणि धार्मिक व्यासपीठ असलेल्या वाराणसी हे पवित्र जलाशयांसाठी प्रसिद्ध आहे. ही सर्व जलाशये गंगानदीला आणि अन्य दोन उपनद्यांना जोडली आहेत. याच जलाशयांच्या प्रदूषणाचा अभ्यास गोगटे यांनी केला आहे. 

सलग तीन वर्षे केलेल्या या अभ्यासातून त्यांनी ‘द इकॉलॉजीकल ऍण्ड हेरिटेज कन्झर्व्हेशन ऑफ एन्शीएन्ट वॉटर बॉडीज्’ या विषयात प्रबंध त्यांनी जपान विद्यापीठात सादर केला. त्यांच्या या संशोधनाला अभ्यासकांनी मान्यता दिली. नुकतेच महेश गोगटे यांनी वाराणसीतील जलप्रदूषणावर केलेले आपले महत्त्वपूर्ण संशोधन आणि त्यातील निष्कर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केले. ही भेट म्हणजे एक यादगार क्षण होता, असे महेश गोगटे म्हणाले. यावेळी त्यांनी जलप्रदूषणाच्या कारणांची आणि त्यातून मी काढलेल्या निष्कर्षाची माहिती पंतप्रधानांनी करुन घेतली. हे संशोधन गंगाजल शुद्धिकरणाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सांगलीच्या युवकाने केलेल्या या संशोधनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला असून, यापुढील संशोधनासाठी प्रोत्साहन दिले आहे.

Related posts: