|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » 20 ऑगस्टपासून ‘जवाब दो’ आंदोलन तीव्र करणार

20 ऑगस्टपासून ‘जवाब दो’ आंदोलन तीव्र करणार 

पुणे / प्रतिनिधी

  • अंनिसचा इशारा, तपासातील दिरंगाईचा जाब विचारणार

 

 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्ट रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येलाही साडेतीन वर्षे पूर्ण होत असून, शासनाकडून दोन्ही हत्यांच्या तपासामध्ये दिरंगाई होत आहे. या दिरंगाईचा जाब विचारण्यासाठी येत्या 20 ऑगस्टपासून ‘जवाब दो’आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला.

याबाबत देमशुख म्हणाले, पुणे, नागपूर, औरंगाबादसह राज्यातील प्रमुख शहरांच्या सोबत प्रत्येक जिह्यामध्ये हे आंदोलन होणार आहे. राज्याबरोबर दिल्ली येथेदेखील ‘जवाब दो’आंदोलन करण्यात आले आहे. केरळ, पंजाब, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्येदेखील हे आंदोलन करण्यात येणार आहे. ऑल इंडियन पिपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ऑगस्टला ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन’ दिवसाचेही आयोजन करण्यात आले आहे.

20 ऑगस्ट रोजी सकाळी 7.15 वाजता विट्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकर यांना जोशपूर्ण गीतांमधून अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर साने गुरुजी स्मारकापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 11 वाजता साने गुरुजी स्मारक येथे ‘भ्रम और निरास’ या हिंदी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. दुपारी 2 वाजता ‘अभिव्यक्ती के खतरे’ या विषयावर अभिनेते प्रकाश राज आणि अमोल पालेकर बोलतील. यानंतर ‘गांधींचं करायचं काय?’ हे एक अंकी नाटक सादर होईल.

Related posts: