|Monday, August 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » स्वप्न घरकुलाचे, विघ्न लालफितीचे

स्वप्न घरकुलाचे, विघ्न लालफितीचे 

‘सर्वांसाठी घर’ संकल्पनेला तडे :  अनेक पावसाळे उलटूनही प्रतीक्षाच

2799 आवश्यक घरे

769 ब, ड यादीत समावेश

112 मिळालेली घरे

657 घरांच्या प्रतीक्षेत

तेजस देसाई / दोडामार्ग:

पूर्वी इंदिरा आवास व आता प्रधानमंत्री योजनेंतर्गत दोडामार्ग तालुक्यातील सन 2011 मधील सर्व्हेनुसार तब्बल 2 हजार 799 कुटुंबांना घरांची आवश्यकता आहे. मात्र, त्यातील ‘ब’ आणि ‘ड’ अशा दोन प्राधान्य याद्या तयार करण्यात येऊन त्यानुसार कार्यवाही सुरू झाली. मात्र, गेल्या तीन वर्षांची घरकुल मंजुरी आकडेवारी पाहता अवघ्या 112 जणांनाच याचा लाभ मिळाला आहे. उर्वरित सुमारे 657 लाभार्थी आपले प्रस्ताव मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

डोक्यावर छप्पर नसलेल्यांसाठी कायमस्वरुपी घर मिळावे, हे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवून काँग्रेसप्रणित केंद्र सरकारने इंदिरा आवास योजना अस्तित्वात आणली. तर काही वर्षांपूर्वी केंद्रात सत्तास्थानी आलेल्या भाजपप्रणित सरकारने थोडे फार बदल करून हीच योजना त्याच नावाने मार्गस्थ केली. त्याचा शुभारंभ 2016 रोजी आग्रा उत्तरप्रदेश येथे झाला ही योजना म्हणजे ‘सर्वांसाठी घरे’ अशी संकल्पना असून शहरी व ग्रामीण अशा दोन भागात योजना विभाजित करण्यात आली आहे. सर्व साधारणत: 25 वर्गमीटर एवढय़ा क्षेत्रफळाच्या जागेत टिकावू, आपत्तीरोधक, स्वयंपाकघर व शौचालयाने सुसज्ज अशा प्रकारची घरे या योजनेतंर्गत उभारण्यात येतात. पूर्वीच्या तुलनेत सध्या या घरकुलाच्या बांधकामासाठी आर्थिक मदतदेखील वाढविण्यात आली आहे. तसेच ग्रामसभेद्वारे लाभार्थ्यांची निवड या योजनेसाठी केली आहे.

2011 मध्ये 2799 घरकुलांची मागणी

या योजनेच्या निकष व नियमावलीनुसार सन 2011 मध्ये झालेल्या सर्व्हे अंतर्गत एकूण 2799 घरकुलांची मागणी झाली. या घरामध्ये माती, गावठी कौले, झोपडी, बेघर असणाऱयांचा समावेश होता. यापैकी प्राधान्य यादीच्या अनुषंगाने दोडामार्ग पं. स. च्या संबधित प्रशासनाने ‘ब व ड’ यादी तयार केली. त्यामध्ये एकूण 769 जणांचा समावेश करण्यात आला. त्यापैकी 20/6/17 मध्ये 71, सन 2017/18 मध्ये 26 तर सन 2018/19 मध्ये 15 अशा अवघ्या 112 कुटुंबांना घरकुलांचा या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे.

657 जणांचे स्वप्न कधी साकारणार?

दोडामार्ग तालुक्यातील आतापर्यंत वरील 112 जणांचे प्रस्ताव मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर उर्वरित 657 प्रस्तावातील कुटुंब आपल्या घरकुलाच्या स्वप्नाकडे डोळे लावून बसली आहेत. त्यातील बहुतांश जणांची सध्याची घरे ही अक्षरश: मोडकळीस आली आहेत. काहींच्या घराची छपरे, भिंती तसेच अन्य भाग मोडकळीस आले आहेत. या कुटुंबांनी या पावसाळय़ापर्यंत जीव मुठीत धरून कसेबसे दिवस काढले. आता त्यांना आपला प्रस्ताव तातडीने मंजूर होणे आवश्यक बनले आहे.

112 घरासाठी तीन वर्षे…657 घरासाठी किती?

एकंदरीत परिस्थिती पाहता तालुक्यातील 112 कुटुंबाचे घरकुलाचे प्रस्ताव पूर्ण होण्यासाठी तीन वर्षे लागली. तर 657 कुटुंबाचे प्रस्ताव पूर्ण होण्यासाठी किती वर्षे लागतील, असा सवाल प्रतीक्षेतील कुटुंब करत आहेत. कारण या योजनेसाठीचे प्रस्ताव तात्काळ पूर्णत्वास येण्यासाठी शासनाकडून देय असलेला निधी गतीने व वाढीव स्वरुपात मिळणे गरजेचे आहे. तरच हे प्रस्ताव मार्गी लागू शकतात.

तीन जि. प. सदस्यांनी पाठपुरावा करावा

दोडामार्ग तालुक्यात एकूण तीन जि. प. सदस्य असून या तिघांनी आपापल्या मतदारसंघातील संबंधित लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर होण्यासाठी जि. प. तसेच राज्य शासनस्तरावर पाठपुरावा करणे आवश्यक आहे. प्रस्ताव प्रलंबित असलेल्या 657 जणांची तशी अपेक्षा आहे.