|Monday, August 19, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय कुस्तीचा नवा पोस्टरबॉय….बजरंग पुनिया

भारतीय कुस्तीचा नवा पोस्टरबॉय….बजरंग पुनिया 

दोनवेळचा ऑलिम्पिक विजेता सुशीलकुमार ज्या दिवशी पहिल्याच फेरीत गारद झाला, त्याच दिवशी त्याच्यापेक्षा बराच कनिष्ठ असलेल्या बजरंग पुनियाने सुवर्णपदक काबीज करत खऱया अर्थाने भारतीय कुस्तीचा नवा पोस्टरबॉय ठरण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. 18 व्या आशियाई स्पर्धेत त्याने मिळवलेले हे भारताचे या हंगामातील पहिलेच सुवर्ण देखील ठरले.

यापूर्वी 2008 बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत 66 किलोग्रॅम फ्री स्टाईल इव्हेंटमध्ये कांस्य जिंकल्यानंतर सुशील कुमार हाच भारतीय कुस्तीचा चेहरामोहरा होता. त्यानंतर चार वर्षांच्या अंतराने त्याने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य जिंकत आपली कामगिरी आणखी किंचीत सुधारली. या 35 वर्षीय अनुभवी खेळाडूने यंदा वर्षाच्या प्रारंभी ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत तिसरे राष्ट्रकुल सुवर्ण जिंकले. पण, त्यानंतर त्याचा तो फॉर्म अजिबात टिकून राहिला नाही. त्यातच यंदा जकार्ता कन्वेन्शन सेंटरमध्ये झालेल्या लढतीत 74 किलोग्रॅम वजनगटात पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्याने त्याच्या पदरी आणखी नामुष्की आली. येथे त्याला बहरीनच्या ऍडमने 5-3 अशा फरकाने पराभूत केले.

दुसरीकडे, अवघ्या 24 वर्षांच्या पुनियाने मात्र धमाकेदार कामगिरी साकारत सुवर्णपदक काबीज केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तसे पाहता बजरंग पुनिया वर्षभरापासूनच उत्तम बहरात आहे आणि येथे त्याने एका अर्थाने आपल्या फॉर्मचीच प्रचिती दिली.

‘माझा मार्गदर्शक योगेश्वर दत्तने इंचेऑनमध्ये चार वर्षांपूर्वी सुवर्ण जिंकले होते आणि इथे मी इथे जिंकू शकेन, असे तो त्यावेळी म्हणाला होता. मी त्याचा विश्वास खरा करुन दाखवल्याचा आनंद आहे’, अशी प्रतिक्रिया या हरियाणाच्या युवा मल्लाने व्यक्त केली.

पुनियाचा सध्याचा उत्तम फॉर्म त्याने कुस्ती गांभीर्याने घेतल्याचे पर्यवसान मानले जाते. पण, स्वतः पुनिया तसे अजिबात मानत नाही. ‘मी कुस्तीप्रती गंभीर नाही, असे ते खूप म्हणायचे. पण, त्यांना जे म्हणायचे आहे, ते ते म्हणू शकत होते. मी त्यांची फारशी काळजी कधीच केली नाही. मी फक्त माझ्या सरावावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित राहील, याची दक्षता घेतली. मी कधीच बदललो नाही. पूर्वीही बदललो नव्हतो. आताही बदललो नाही. फक्त पाहणाऱयांच्या नजरा बदलल्या आहेत. आजही मला जिथे संधी मिळते, तिथे मनमुराद नाचून माझा आनंद व्यक्त करतो’, असे बजरंग पुनियाने याप्रसंगी स्पष्ट केले.