|Monday, January 20, 2020
You are here: Home » क्रिडा » राही सरनोबतचा ऐतिहासिक सुवर्ण‘वेध’

राही सरनोबतचा ऐतिहासिक सुवर्ण‘वेध’ 

25 मी. एअर पिस्तूल प्रकारात यशाला गवसणी आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळवणारी पहिली भारतीय नेमबाज, 

वृत्तसंस्था/ जकार्ता

स्टार नेमबाज राही सरनोबतने बुधवारी 25 एअर मी पिस्तूल प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवताना महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचावली. विशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. याआधी, तिला 2014 आशियाई स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. नेमबाजीतील यशानंतर वुशुमध्येही भारताला 4 कांस्यपदके मिळाली. हॉकीत पुरुष संघाने हाँगकाँगचा तब्बल 26-0 ने धुव्वा उडवताना आपली विजयी आगेकूच कायम ठेवली आहे. अर्थात, एशियाडमधील भारताचे चौथे सुवर्णपदक ठरले असून एकूण पदकसंख्या 12 झाली आहे.

बुधवारी झालेल्या महिलांच्या 25 मी एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या राहीला थायलंडच्या यांगपाबूनकडून कडवी झुंज मिळाली. 27 वर्षीय राहीने पहिल्या फेरीपासून शानदार खेळ करत आपले अव्वल स्थान कायम राखले होते. मात्र, शेवटच्या क्षणी थायलंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने राहीला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. यामुळे अंतिम फेरीत राही व थायलंडच्या यांगपाबूनचे 34-34 असे समान गुण झाले. सुवर्णपदकासाठी शेवटी शूटऑफचा वापर करण्यात आला. पहिल्या शूटऑफमध्ये दोन्ही खेळाडूंचे 4-4 असे गुण समान झाल्याने दुसऱया शूटऑफचा वापर करण्यात आला. या शूटऑफमध्ये राहीने 3-2 अशी बाजी मारताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. थायलंडच्या यांगपाबूनला रौप्य तर दक्षिण कोरियाच्या किम मिनजुंगला कांस्यपदक मिळाले.

अर्थात, या प्रकारात 16 वर्षीय युवा नेमबाज मनू भाकरला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. पात्रता फेरीत मनू भाकरने पहिला क्रमांक मिळवला होता, तर राहीला सातवे स्थान मिळाले होते. पात्रता फेरीत निराशाजनक कामगिरी केलेल्या राहीने अंतिम फेरीत मात्र दर्जेदार कामगिरी करताना सुवर्णयश मिळवले. मनूला मात्र पदकापासून वंचित रहावे लागले.

व्ाgशुमध्ये भारताला चार कांस्य

नेमबाजीपाठोपाठ बुधवारी वुशुमध्ये भारताच्या चार खेळाडूंनी कांस्यपदके मिळवत पदकतालिकेत भर घातली. महिलांच्या 60 किलो गटात भारताच्या रोशबिना देवीला उपांत्य फेरीत चीनच्या केईकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, यानंतर रोशबिनाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. यानंतर, पुरुषांच्या 56 किलो गटात संतोष कुमारला, 60 किलो गटात सुर्या सिंगला तर 65 किलो गटात नरेंदर गरवालला कांस्यपदक मिळाले. उपांत्य फेरीत अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आल्याने भारताच्या खेळाडूंना कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले.

टेनिसमध्ये भारताची 4 पदके निश्चित

महिलांच्या एकेरीतील उपांत्यपूर्व सामन्यात भारताची स्टार टेनिसपटू अंकिता रैनाने विजयी घोडदौड कायम राखली. अवघ्या 54 मिनिटाच्या सामन्यात अंकिताने हाँगकाँगच्या युडिस चोंगचा 6-4, 6-1 असा पराभव केला. या विजयासह अंकिताने उपांत्य फेरी गाठताना आपले पदक निश्चित केले आहे. पुरुषांच्या एकेरीत रामकुमार रामनाथनला उपांत्यपूर्व सामन्यात उझबेकच्या ज्युराबेककडून 3-6, 6-4, 6-3 असा पराभव स्वीकारावा लागला. याशिवाय, प्रज्नेश गुणेश्वरनने व्हिएतनामच्या लि नामचा 6-3, 5-7, 6-4 असा पराभव करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. याशिवाय, मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा व अंकिता रैना यांनी अंतिम चारमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय जोडीने हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धी जोडीचा 6-4, 6-4 असा पराभव केला. तसेच, पुरुष दुहेरीत बोपण्णा व शरण जोडीने तैपेईच्या जोडीला 6-3, 6-3 असे नमवत उपांत्य फेरी गाठली.

कुस्ती, व्हॉलीबॉलमध्ये भारताच्या पदरी निराशा

व्हॉलीबॉलमध्ये एफ गटात भारताच्या पदरी पुन्हा अपयश आले. कतारविरुद्ध लढतीत भारतीय संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह आशियाई स्पर्धेतील भारताच्या पदक जिंकण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. याशिवाय, कुस्तीत ग्रीको रोमन प्रकारात 77 किलो गटात गुरप्रीत सिंग, 87 किलो गटात हरप्रीत सिंग, 130 किलो गटात नवीन यांना पदकापासून वंचित रहावे लागले.

राही आशियाई स्पर्धेत सुवर्ण मिळवणारी पहिला महिला खेळाडू

राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमी केल्हापूरात जन्मलेल्या राही सरनोबतचा प्रवासही अविस्मरणीय असा आहे. 2008 मध्ये पुण्यातील युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. 2010 राष्ट्रकुल स्पर्धेत 1 सुवर्ण व 1 रौप्य जिंकल्यानंतर तिचा यशाचा आलेख चढता राहिला आहे. अर्थात, 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत तिला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यानंतर, 2014 राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णयश मिळवले होते. तर 2014 मध्येच इंचेऑन आशियाई स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

अर्थात, आशियाई स्पर्धेत 2014 मध्ये हुकलेल्या सुवर्णपदकाची भरपाई जकार्ता आशियाई स्पर्धेत करताना या स्पर्धेत सुवर्ण जिंकताना पहिली भारतीय महिला नेमबाज होण्याचा बहुमान पटकावला. याशिवाय, जसपाल राणा, रणधीर सिंग, जितू राय, रंजन सोधी व सौरभ चौधरी यांच्यानंतर सुवर्णपदक जिंकणारी भारताची सातवी खेळाडू ठरली आहे. या यशानंतर संपूर्ण देशभरातनू तसेच कर्मभूमी असलेल्या केल्हापूरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

 

Related posts: